Video: लाईव्ह व्हिडीओमध्ये मुलाने केला स्पर्श…; मराठमोळ्या इन्फ्लूएन्सरने त्याच्या घरी जाऊन…

सध्या सोशल मीडियावर एका मराठमोळ्या इन्फ्लूएन्सरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिला एका मुलाने स्पर्श केल्याचे दिसत आहे. त्यानंतर तिने जे पाऊल उचलले ते पाहून नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.

Video: लाईव्ह व्हिडीओमध्ये मुलाने केला स्पर्श...; मराठमोळ्या इन्फ्लूएन्सरने त्याच्या घरी जाऊन...
Social Media Influencer
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Apr 27, 2025 | 1:35 PM

दिवसागणिक महिलांवरील अत्याचार आणि छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे, ज्यामुळे समाजातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर, सोशल मीडिया मराठमोळ्या इन्फ्लूएन्सरसोबत घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना तिच्याच इमारतीत घडली असून, तिने याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपली बाजू मांडली आहे. तिने जे काही केले ते पाहून सर्वांनी तिचे कौतुक केले आहे.

नेमकं काय घडलं?

ही मराठमोळी सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर दुसरी तिसरी कोणी नसून मानसी सुरवसे आहे. मानसी ही सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे आणि तिचे जवळपास दहा लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. तिने नुकताच शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये ती इमारतीच्या पायऱ्यांवर व्हिडिओ रेकॉर्ड करत असते. तो व्हिडीओ रेकॉर्ड करत असताना एक मुलगा येतो आणि चुकीच्या पद्धतीने तिच्या अंगाला स्पर्श करताना दिसतो. या कृत्याला तिने विरोध केला आणि त्या मुलाच्या ती कानशिलात लगावते. या घटनेने ती स्वतःच्या आणि इतर महिलांच्या सुरक्षेसाठी आवाज उठवत आहे.

वाचा: मुस्लीम अभिनेत्याने केले दोन हिंदू मुलींशी लग्न, १२ वर्षांनी मोठ्या मुलीवर प्रेम; आता आहे १२०० कोटींचा मालक

मानसी इथेच थांबली नाही. तर मानसी त्या मुलाच्या घरी गेली आहे. तिने घडलेला प्रकार त्याच्या कुटुंबीयांना सांगितला आहे. हे सर्व करत असताना मानसीने व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडीओ तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला शेअर केला आहे.

मानसीने शेअर केला व्हिडीओ

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये मानसीने सविस्तर माहिती दिली आहे. ती म्हणते की, ती इमारतीच्या पायऱ्यांवर व्हिडिओ शूट करत असताना एक मुलगा अचानक तिथे आला आणि तिच्या शरीराला स्पर्श करत पुढे निघून गेला. तिने त्याला थांबवून त्याच्या कृत्याबद्दल जाब विचारला, पण त्याने कोणतेही उत्तर दिले नाही. नंतर त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्याला मानसिक आजार आहे.

यावर मानसीने तीव्र नाराजी व्यक्त केली आणि स्पष्ट केले की, “मुलाला कोणताही मानसिक त्रास असला तरी असे कृत्य करण्याचे कोणतेही समर्थन होऊ शकत नाही. समाजात महिलांना त्यांच्या कपड्यांवरून किंवा व्यक्तिमत्त्वावरून हिणवण्याची प्रवृत्ती आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाचे आहे त्यांची सुरक्षा.” ती पुढे म्हणाली की, तिने साडी किंवा इतर कोणतेही कपडे घातले असते, तरीही असे कृत्य घडले असते.

काही लोकांनी हा व्हिडिओ प्रसिद्धीसाठीचा स्टंट असल्याचा आरोप केला आणि तो स्क्रिप्टेड असल्याचे म्हटले. यावर मानसीने ठामपणे उत्तर दिले की, “हा व्हिडिओ बनवण्यामागे माझा कोणताही स्वार्थ नाही. माझा उद्देश फक्त इतकाच आहे की, महिलांनी अशा घटनांविरोधात आवाज उठवावा आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या छेडछाडीला थारा देऊ नये.” तिने सर्व महिलांना आवाहन केले की, अशा घटनांविरोधात निर्भयपणे लढावे आणि स्वतःच्या सुरक्षेसाठी जागरूक राहावे.