Kiran Mane | किरण माने यांना मालिकेतून काढल्यानंतर अखेर निर्मात्यांचं स्पष्टीकरण, राजकीय भूमिका घेतल्यानं हकालपट्टी नाही?

| Updated on: Jan 14, 2022 | 9:01 PM

मुलगी झाली होती मालिकेतील अभिनेते किरण माने यांना मालिकेतून का काढून टाकण्यात आलं, याबाबत अखेर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. राजकीय भूमिका घेतल्यामुळे त्यांना मालिकेतून काढण्यात आलं असल्याची चर्चा दिवसभर सुरु होती.

Kiran Mane | किरण माने यांना मालिकेतून काढल्यानंतर अखेर निर्मात्यांचं स्पष्टीकरण, राजकीय भूमिका घेतल्यानं हकालपट्टी नाही?
किरण माने, अभिनेते
Follow us on

मुंबई : मुलगी झाली होती (Star Pravah Serial Mulagi Jhali ho) मालिकेतील अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना मालिकेतून का काढून टाकण्यात आलं, याबाबत अखेर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. राजकीय भूमिका घेतल्यामुळे त्यांना मालिकेतून काढण्यात आलं असल्याची चर्चा दिवसभर सुरु होती. यावरुन राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या होत्या. अखेर किरण माने यांना मालिकेतून काढण्यामागे व्यावसायिक कारणं दिलं गेलं असल्याचं वृत्त हाती आलं आहे. यामुळे राजकीय पोस्ट किंवा राजकीय भूमिका घेतल्यानं अभिनेते किरण माने यांना मालिकेतून काढण्यात आलेलं नाही, असा संदेश जावा, असाही प्रयत्न होत असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, नेमकी व्यावसायिक कारण देताना कोणत्या बाबी किरण माने यांच्याबाबत खटकल्या आहेत, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मुलगी झाली हो मालिकेत काम करणाऱ्या किरण माने यांची मालिकेतून हकालपट्टी झाल्यानंतर मराठी कलाकार आणि राजकीय भूमिका हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला होता.

आंसुओं से गाऊंगा- किरण माने

माने यांना मालिकेतून काढून टाकल्यामुळे सोशल मीडयावर वेगवेगळी मते व्यक्त केली जात आहे. लोकांनी माने यांना पाठिंबा दर्शवला असून भाजपवर टीका केली जात आहे. तर दुसरीकडे माने यांनी दोन ओळींची फेसबुक पोस्ट टाकत माघार घेणार नाही तर लढत राहीन असं सूचित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी “काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा…गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा,” असे म्हणत मतं व्यक्त करतच राहणार अशी भूमिका घेतली आहे.

टीव्ही 9सोबत बोलताना काय म्हणाले किरण माने?

किरण माने यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी संवाद साधताना आपला निर्धार बोलून दाखवला. मला सांगितलं जातं तुम्ही केंद्र सरकारच्या विरोधात आहात. पण मग मी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत त्यांच्या बाजूनेही पोस्ट लिहिली आहे. ती पोस्ट राज्य सरकारच्या विरोधात आहे. कोणतंही सरकार आलं तरी त्यांच्या विरोधात मी पोस्ट करणारच. तो माझा हक्क आहे. कलाकारांनी राजकारणावर बोलू नये असे काही जण मला सूचवत आहेत. या आधीही अनेक अभिनेते होऊन गेले त्यांनी बरीचशी व्यक्तव्य केली आहेत. भूमिका घेतल्या आहेत. आपण जर या पुढील काळात बोललं नाही तर ही वृत्ती अशीच फोफावत जाणार, असं माने म्हणाले.

‘मुलगी झाली हो’ शूट सुरू असताना मला हिंदी प्रॉडक्शन्स हाउसमधून फोन आला की तुमच्यावर काहीजण नाराज असल्यामुळे तुम्हाला रिप्लेस केले जात आहे. राजकीय पोस्ट केल्यामुळे एका महिलेने तक्रार केली असल्याची माहिती समजत आहे. सर्व पक्षाच्या नेत्यांवर मी वेगवेगळ्या पोस्ट लिहीत असतो. मी एखाद्या नेत्याबाबत चांगली पोस्ट लिहिली म्हणजे मी त्या पक्षाचा झालो असं होत नाही. मी आजवर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार मांडत आलो आहे आणि मांडत राहणार. विद्रोही तुकारामाचे विचार मी मांडत आलो आहे आणि ते मी आजच्या काळाशी जोडतो आहे, असं त्यांनी सांगितलं.

पाहा व्हिडीओ –