मुस्लीम आहेस, लग्नासाठी मुलगा भेटणार नाही..; प्रसिद्ध अभिनेत्रीला थेट मॅचमेकरनेच नाकारलं

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला. लग्नासाठी ती मुलगा शोधत होती. तेव्हा एका प्रसिद्ध मॅचमेकरने तिला मुस्लीम असल्याचं सांगून नाकारलं होतं. तुला कोणीच मुलगा भेटणार नाही, असं ती म्हणाली होती.

मुस्लीम आहेस, लग्नासाठी मुलगा भेटणार नाही..; प्रसिद्ध अभिनेत्रीला थेट मॅचमेकरनेच नाकारलं
Sima Taparia
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 22, 2025 | 8:31 AM

अरेंज मॅरेज करायचं असेल तर जोडीदार शोधण्यासाठी कुटुंबीयांकडून अनेक मार्ग अवलंबले जातात. त्यापैकी एक चर्चेत असलेला मार्ग म्हणजे, मॅचमेकरकडे जाऊन स्थळ शोधणं. परंतु प्रत्येकाचाच अनुभव यात चांगला असतो, असं नाही. ‘कुसुम’ आणि ‘वसुधा’ यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नौशीन अली सरदारने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेल्या एका विचित्र अनुभवाबद्दल खुलासा केला. प्रसिद्ध मॅचमेकर (लग्नासाठी जोड्या जुळवणारे) सीमा तपारियाने धर्माचं कारण देत नौशीनच्या विनंतीला नाकारलं होतं. मुंबईची मॅरेज कन्सल्टंट सीमा तपारिया ही नेटफ्लिक्सच्या ‘इंडियन मॅचमेकिंग’मध्येही झळकली होती. जगभरातील लोकांना ती अरेंज मॅरेजसाठी मार्गदर्शन करते आणि जोडीदार शोधण्यासाठी मदत करते.

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत नौशीन अली सरदार म्हणाली, “माझी बहिणीने त्यांच्याशी संपर्क साधला होता, कारण त्यांचा शो हिट होता. मला वाटतं की कोविडदरम्यानची गोष्ट आहे, जेव्हा माझ्या बहिणीने मला सांगितलं होतं की, तुला योग्य जोडीदार शोधता येत नाही. कमीत कमी आम्हाला तरी तुझी मदत करू दे. मला काहीच समस्या नाही, असं सांगून मी तिला जोडीदार शोधण्यासाठी होकार दिला होता. मला कोणी आवडलं तर मी नक्कीच त्याच्याशी लग्न करेन, असं तिला म्हटलं होतं. तिने सीमा यांचा शो पाहिला होता आणि त्यांची भेट घेण्याचं ठरवलं होतं. माझ्यासाठी समस्या हीच होती की, मी मुस्लीम म्हणून जन्माला आले असले तरी मी इस्लामला मानत नाही. मग माझ्यासाठी योग्य मुलगा कोण असेल?”

या मुलाखतीत नौशीनने सीमा यांच्या त्या प्रतिक्रियेबद्दल सांगितलं, जी ऐकून तिला धक्काच बसला होता. सीमाने तिच्या धर्मामुळे तिला क्लायंट म्हणून स्वीकारण्यास नकार दिला, असा दावा नौशीनने केला. “सीमा म्हणाल्या, तू मुस्लीम असल्याने आम्हाला तुझ्यासाठी कोणीही सापडत नाही. मी आधीच त्यांचा शो पाहून त्यांची मस्करी करायची. एका मुलीने नेहमी गप्प राहिलं पाहिजे आणि नेहमी मान खाली घालून बसलं पाहिजे, असं त्या म्हणायच्या. हे पाहून मी मनातल्या मनात हसायची. आता त्याच व्यक्तीने मला माझ्या धर्माच्या कारणामुळे मुलगा शोधू शकणार नसल्याचं म्हटलं होतं”, असं ती पुढे म्हणाली. नौशीनची आई ईराणी असून तिचे वडील पंजाबी आहेत.