Mayuri Deshmukh: मयुरी देशमुखने सांगितलं मालिकांपासून दूर राहण्यामागचं खरं कारण; म्हणाली, खुलता कळी खुलेनानंतर..

Mayuri Deshmukh: 'खुलता कळी खुलेना' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मालिकांपासून दूर राहण्यामागच्या कारणाविषयी व्यक्त झाली.

Mayuri Deshmukh: मयुरी देशमुखने सांगितलं मालिकांपासून दूर राहण्यामागचं खरं कारण; म्हणाली, खुलता कळी खुलेनानंतर..
Mayuri Deshmukh
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 16, 2026 | 8:16 AM

Mayuri Deshmukh: मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मयुरी देशमुख हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. मात्र, या मालिकेनंतर मयुरी फारशा मराठी मालिकांमध्ये दिसली नाही. त्यामुळे तिने मराठी टेलिव्हिजन विश्वापासून अंतर का ठेवलं, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जात होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मयुरीने यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

मयुरी देशमुखने ‘लोकशाही’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या अभिनयप्रवासाबद्दल आणि मालिकांपासून दूर राहण्यामागच्या कारणाबद्दल भाष्य केलं. ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेनंतर तिने नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, हे नाटक तिने स्वतः लिहिलं होतं. त्यानंतर तिने दोन ते तीन चित्रपटांमध्येही काम केलं. मात्र, या चित्रपटांना अपेक्षित प्रतिसाद किंवा म्हणावा तसा रिच मिळाला नाही, असं तिने सांगितलं. मालिकांबाबत बोलताना मयुरी म्हणाली की, ‘खुलता कळी खुलेना’नंतर मालिकांच्या बाबतीत माझं सूरताल काही जुळलं नाही. मला हवे तसे विषय मिळत नव्हते. त्यामुळे मी जाणीवपूर्वक अभिनयातून ब्रेक घेतला, असं काही नव्हतं. पण मला अपेक्षित असलेलं काम मिळत नव्हतं. त्यामुळे मी लिखाणाकडे वळले.

Loading...

अभिनयासोबत लिखाणालाही दिलं प्राधान्य

मयुरीने केवळ अभिनेत्री म्हणूनच नव्हे, तर लेखिका म्हणूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. स्वतःचं नाटक लिहिण्यापासून ते त्यात काम करण्यापर्यंत तिने विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्याचबरोबर काही चित्रपटांमध्येही ती झळकली. त्यामुळे अभिनयापासून दूर जाण्यापेक्षा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये स्वतःला आजमावण्याचा तिचा प्रयत्न होता. यानंतर मयुरीने हिंदी मालिकेतही भूमिका साकारली. मात्र, हिंदी मालिकेत काम केल्यानंतर प्रेक्षकांमध्ये तिच्याबद्दल वेगळीच चर्चा सुरू झाली. ती आता मराठी मनोरंजनविश्वात काम करत नाही, असं अनेकांना वाटू लागलं होतं. यावरही तिने स्पष्ट भूमिका मांडली.

‘ज्या भाषेत चांगलं काम मिळेल, ते करणार’

मयुरी म्हणाली की, हिंदी मालिकेत काम केल्यानंतर लोकांना असं वाटू लागलं की आता ही मराठीत काम करत नाहीये. पण तसं अजिबात नाही. माझा एकदम साधा नियम आहे. ज्या भाषेत मला चांगलं काम मिळणार, ते काम मी करणार. तिच्या या विधानातून कामाची निवड करताना भाषेपेक्षा भूमिकेला आणि विषयाला अधिक महत्त्व देत असल्याचं स्पष्ट होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us