
अभिनेत्री परिणीची चोप्रा, स्वरा भास्कर, राधिका कुमारस्वामी आणि आयेशा टाकिया यांसारख्या काही अभिनेत्रींनी राजकीय व्यक्तींशी लग्न केलं. मात्र इंडस्ट्रीत एक असाही अभिनेता आहे, ज्याने माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीशी लग्नगाठ बांधली आहे. या अभिनेत्याचं नाव आहे शरद कपूर. फेब्रुवारी 1976 मध्ये जन्मलेल्या शरदने 1994 मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ‘मेरा प्यारा भारत’ हा त्याचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला. पदार्पणातील चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर शरदने टेलिव्हिजनकडे आपला मोर्चा वळवला. 1995 मध्ये महेश भट्ट दिग्दर्शित ‘स्वाभिमान’ या टीव्ही सीरिजमधून शरदला लोकप्रियता मिळाली. शरदच्या कामाने महेश भट्ट इतके प्रभावित झाले होते, की त्यांनी त्यानंतर ‘दस्तक’ या चित्रपटाची ऑफर त्याला दिली. 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या याच चित्रपटातून त्यावेळची ‘मिस युनिव्हर्स’ सुष्मिता सेनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
नंतरच्या काळात शरदने इतरही काही चित्रपटांमध्ये रोमँटिक भूमिका साकारल्या होत्या. मात्र ते सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. हिरो म्हणून फ्लॉप ठरल्यानंतर शरदने नकारात्मक भूमिका साकारण्यास सुरुवात केली. खलनायकी भूमिकांमुळे शरदला चांगलंच यश मिळालं. शरदने शाहरुख खान, सलमान खान आणि हृतिक रोशन यांच्यासोबत ‘जोश’, ‘लक्ष्य’, ‘जय हो’ आणि ‘एलओसी कालगिल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.
शरदच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, त्याने 2008 मध्ये कोयल बासूशी लग्न केलं. कोयल ही पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बासू यांची नात आहे. ज्योती बासू हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) संस्थापक सदस्यांपैकी एक होते. 1977 ते 2010 पर्यंत ते सर्वांत जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेल्यांमध्ये तिसरे होते.
गेल्या वर्षी शरद एका वादग्रस्त प्रकरणामुळे चर्चेत आला होता. 2024 मध्ये एका महिलेनं शरदवर विनयभंगाचा आरोप करत एफआयआर दाखल केली होती. त्यानंतर ‘फ्री प्रेस जर्नल’ला दिलेल्या मुलाखतीत शरदने त्याच्यावरील आरोप फेटाळले होते. “माझ्याविरोधात दाखल झालेल्या कोणत्याही केसबद्दलची मला माहिती नाही. मी आताच न्यूयॉर्कहून परतलोय आणि पोलिसांनी संपर्क केला तेव्हा मी कोलकातामध्ये होतो. तशी कोणती घटनाच घडली नव्हती. त्यामुळे मी कोणावरही खोटे आरोप करू शकत नाही.”