पुण्याची जिगरबाज जोडी आकाश-सूरज मोरे ठरले ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’चे महाविजेते

आकाश आणि सूरज जरी या पर्वाची विजेती जोडी असली तरी या स्पर्धेतील सर्वच जोड्यांनी या पर्वात आपली चमकदार कामगिरी दाखवली आहे. या महाअंतिम सोहळ्यात सर्वच जोड्यांनी दमदार परफॉर्म केलं होतं.

पुण्याची जिगरबाज जोडी आकाश-सूरज मोरे ठरले ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’चे महाविजेते
Mi Honar Superstar Jodi No 1 winners
| Edited By: | Updated on: Jul 08, 2024 | 10:07 AM

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. पलख-पूर्वा, आकाश-सूरज, सिद्धेश-रुचिता आणि अपेक्षा-प्रतिक्षा यांच्यामध्ये ही महाअंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत कोथरुड पुणे येथील आकाश आणि सुरज मोरे या जिगरबाज जोडीने बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर उपविजेते पदाचा मान सिद्धेश थोरात-रुचिता जामदार आणि अपेक्षा लोंढे-प्रतिक्षा लोंढे या दोन जोड्यांना विभागून देण्यात आला. पूर्वा साळेकर आणि पलक मोरे या जोडीने तृतीय क्रमांक पटकावला. महाअंतिम सोहळ्यातील विजेती जोडी आकाश आणि सूरज मोरे यांना पाच लाखांची रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं. तर उपविजेता जोडीला दोन लाख आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या जोडीला एक लाख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं.

विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना आकाश आणि सूरज म्हणाले, “आम्ही आजवर बऱ्याच स्पर्धांमध्ये भाग घेतला, मात्र मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन या कार्यक्रमाने विजेतेपदाचा आनंद मिळवून दिला. आम्हाला आमची प्रतिभा सिद्ध करण्यासाठी हक्काचा मंच दिल्याबद्द्ल स्टार प्रवाह वाहिनीचे खूप खूप आभार. हा सारा प्रवास स्वप्नवत आहे. या क्षणाची खूप वाट पाहिली होती. महाअंतिम सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आम्ही बरीच मेहनत घेतली होती. इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे खूप आनंद होत आहे. या मंचाने अंकुश चौधरी, फुलवा खामकर आणि वैभव घुगे गुरुच्या रुपात दिले. या गुरुंकडून खूप काही शिकायला मिळालं.”

आकाश आणि सूरज दोघेही सख्खे भाऊ आहेत. लहानपणापासूनच दोघांनाही नृत्याची आवड होती. घराची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. मात्र तरीही दोघांची नृत्याची आवड लक्षात घेऊन त्यांच्या आईने त्यांना नृत्याचं प्रशिक्षण देण्याचं ठरवलं. त्यातही बरीच आव्हानं त्यांच्यासमोर होती. अनेक अडचणींचा सामना करत आकाश आणि सूरजने आपली नृत्याची आवड जोपासली. अनेक छोट्या मोठ्या स्पर्धांमधून भाग घेत आकाश-सूरजला ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’ कार्यक्रमाविषयी कळलं आणि त्यांनी ऑडिशनसाठी थेट मुंबई गाठली. ऑडिशन ते विजेते होण्यापर्यंतचा हा त्यांचा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे. आकाश आणि सूरजचं यश पाहून त्यांच्या आईचे डोळे पाणावले होते. हे घवघवीत यश आकाश आणि सूरजचा पुढील प्रवास अधिक तेजोमय करेल हे नक्की.