‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेतल्या छोट्या सावित्रीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम

मधुराणी प्रभुलकर आणि अमोल कोल्हे यांच्या मुख्य भूमिका असलेली 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका संध्याकाळी 7.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेत तक्षा शेट्टी छोट्या सावित्रीबाईंची भूमिका साकारतेय.

मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेतल्या छोट्या सावित्रीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम
मधुराणी प्रभुलकर
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 18, 2026 | 2:24 PM

स्टार प्रवाह वाहिनीवर नुकत्याच सुरु झालेल्या ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्तम प्रतिसाद मिळतोय. विशेष करुन या मालिकेतील लहानग्या सावित्रीने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सावित्रीबाईंचा ठाम निर्धार, आत्मविश्वास, शिक्षणाची ओढ, अन्यायाविरोधात उभं राहण्याची ताकद आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द या सगळ्या गुणांचा प्रत्यय लहानग्या सावित्रीने साकारलेल्या प्रत्येक प्रसंगात जिवंत होते. ही भूमिका साकारणारी गुणी बालकलाकार तक्षा शेट्टी हिने आपल्या सहज अभिनयातून सावित्रीबाईंचं बालपण अतिशय प्रामाणिकपणे साकारलं आहे.तिच्या निरागस डोळ्यांत दिसणारा प्रश्नार्थक भाव, अन्यायाविरोधात उभं राहण्याची धडपड, शिक्षणासाठी असलेली आंतरिक जिद्द आणि स्वप्न पाहण्याचं धाडस या सगळ्यांतून भावी क्रांतीची चाहूल मिळते.

सावित्रीबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखलेही छोट्या सावित्रीचा अभिनय पाहून भारावून गेली आहे. छोट्या सावित्रीचं कौतुक करताना मधुराणी म्हणाल्या, “छोट्या सावित्रीची चुणूक आणि सावित्रीबाईंच्या भूमिकेसाठी लागणारी ऊर्जा तक्षाने सहजरित्या पकडली आहे. मला प्रचंड अभिमान वाटतो तिचा अभिनय पहाताना. तिला पहिल्यांदा भेटले तेव्हा माझ्याच छोट्या रुपाला भेटल्याचा भास झाला. इतक्या लहान वयातही तिची मेहनत, तिचं शिस्तबद्ध काम, तिची मेहनती वृत्ती आणि प्रत्येक सीनबद्दलची तळमळ खरंच वाखाणण्यासारखी आहे. ती फक्त भूमिका साकारत नाही, तर ती ती भूमिका मनापासून जगते. हे खरंच वाखाणण्यासारखं आणि कौतुकास्पद आहे.”

मालिकेतील आपल्या भूमिकेविषयी मधुराणी याआधी म्हणाल्या होत्या, “सावित्रीबाई फुले युगस्त्री होत्या. इतकं आभाळा एवढं व्यक्तिमत्त्व साकारायला मिळणं मोठी जबाबदारी आहे. आज आपण मुक्तपणे शिकत आहोत, आपल्याला पाहिजे त्या क्षेत्रात काम करत आहोत, अभिमानाने मिरवत आहोत. पण त्यासाठी दीडशे वर्षांपूर्वी एका स्त्रीने इतका मोठा संघर्ष केला. मला सगळ्यांच्या वतीने सावित्रीबाईंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळतेय याचा आनंद आहे. उत्सुकता, हुरहूर आणि दडपण अश्या संमिश्र भावना आहेत.”

कलाकार म्हणून माझं भाग्य आहे की वेगवेगळ्या लार्जर दॅन लाईफ भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली. महात्मा जोतीराव फुले यांची व्यक्तिरेखा साकारणं हे एक वेगळं आव्हान आहे, अशी भावना मालिकेत जोतीराव फुले साकारणारे अभिनेते अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली होती.