
रशियन मॉडेल आणि ‘मिस युनिव्हर्स’ची माजी स्पर्धक केसेनिया अलेक्झांड्रोवाचं वयाच्या 30 व्या वर्षी निधन झालं. जुलै महिन्यात केसेनियाच्या कारचा विचित्र अपघात झाला होता. रशियातील ट्वेर ओब्लास्ट इथं तिची कार अचानक रस्त्यावर आलेल्या एका प्राण्याशी धडकली. त्यावेळी कारमध्ये केसेनिया प्रवासी सीटवर बसली होती आणि तिचा पती गाडी चालवत होता. या अपघातात केसेनियाच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. या घटनेच्या काही आठवड्यांनंतर 12 ऑगस्ट रोजी तिने अखेरचा श्वास घेतला. केसेनिया ही 2017 मध्ये ‘मिस युनिव्हर्स’ या सौंदर्यस्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर होती.
रशियातील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिच्या पतीने अपघाताविषयी प्रतिक्रिया दिली होती. “रस्त्यावर तो प्राणी अचानक मध्येच आणि माझ्यासाठी काहीही करण्यासाठी वेळ नव्हता. त्या प्राण्याने आमच्या गाडीवर उडी मारली आणि केसेनियाच्या डोक्याला गाडीची जोरदार धडक बसली. ती बेशुद्ध होती आणि तिच्या डोक्याला जबर मार लागला होता. ती पूर्णपणे रक्ताने माखली होती”, असं त्याने सांगितलं. अपघात घडताच इतर ड्राइव्हर्स आणि आपत्कालीन सेवांनी त्वरित प्रतिसाद दिला होता. परंतु केसेनियाची दुखापत खूप गंभीर होती. तिला तातडीने मॉस्कोच्या रुग्णालयात नेण्यात आलं होतं. याच रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला.
केसेनियाचं लग्न चार महिन्यांपूर्वीच 22 मार्च रोजी झालं होतं. तिने तिच्या लग्नाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. 2017 मध्ये तिने ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत रशियाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्याच वर्षी ती ‘मिस रशिया’ स्पर्धेत पहिली उपविजेती ठरली होती. याशिवाय ती प्रोफेशनल मानसशास्त्रज्ञही होती. तिने मॉस्को पेडॅगॉजिकल स्टेट युनिव्हर्सिटीमधून पदवी प्राप्त केली होती.
केसेनियाच्या एजन्सीनेही सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. मोडस विवेंडिस या एजन्सीने इन्स्टाग्रामवर लिहिलं, ‘आमची सहकारी, मैत्रीण आणि मॉडेल केसेनियाच्या निधनाच्या बातमीने आम्हाला अत्यंत दु:ख जालं आहे. ती अत्यंत हुशार, प्रतिभावान आणि तेजस्वी होती. आपल्या सभोवतालच्या प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा, आधार आणि प्रसंगी मायेची ऊब कशी द्यायची, हे तिला माहीत होतं. आमच्यासाठी ती नेहमीच सौंदर्य, दयाळूपणा आणि आंतरिक शक्तीचं प्रतीक राहील. आम्ही तिच्या कुटुंबीयांप्रती मनापासून शोक व्यक्त करतो. ‘