Bigg Boss फेम शिव ठाकरेनं घेतली राज ठाकरेंची भेट; पक्षप्रवेशाविषयी प्रश्न विचारताच म्हणाला..

बिग बॉस 16 मध्ये असेही काही स्पर्धक होते, ज्यांना विजेतेपदाची ट्रॉफी तर मिळाली नाही, मात्र त्यांनी आपल्या दमदार कामगिरीने प्रेक्षकांची मनं जिंकली. असाच एक स्पर्धक म्हणजे शिव ठाकरे. शिव हा बिग बॉस 16 मधील सर्वांत तगडा स्पर्धक मानला जात होता.

Bigg Boss फेम शिव ठाकरेनं घेतली राज ठाकरेंची भेट; पक्षप्रवेशाविषयी प्रश्न विचारताच म्हणाला..
Shiv Thakare met Raj Thackeray
Image Credit source: Tv9
| Updated on: Feb 26, 2023 | 12:43 PM

मुंबई : बिग बॉसचा सोळावा सिझन संपला असला तरी त्यातील स्पर्धक विविध कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. यातील काही स्पर्धकांना बिग बॉस संपल्यानंतर मालिकांची ऑफर मिळाली, तर काहींना चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. बिग बॉस 16 मध्ये असेही काही स्पर्धक होते, ज्यांना विजेतेपदाची ट्रॉफी तर मिळाली नाही, मात्र त्यांनी आपल्या दमदार कामगिरीने प्रेक्षकांची मनं जिंकली. असाच एक स्पर्धक म्हणजे शिव ठाकरे. शिव हा बिग बॉस 16 मधील सर्वांत तगडा स्पर्धक मानला जात होता. प्रत्येक टास्कमध्ये त्याने मेहनत घेतली आणि बरेच टास्क त्याने जिंकले होते.

शिवने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली नसली तरी त्याची खेळी प्रेक्षकांना खूप आवडली. आता घरातून बाहेर पडल्यानंतर त्याला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळतंय. चाहते त्याचं तोंडभरून कौतुक करत आहेत. इतकंच नव्हे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवला त्यांच्या घरी आमंत्रित केलं. या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या फोटोमध्ये शिव ठाकरे हे राज ठाकरेंच्या संपूर्ण कुटुंबासोबत पहायला मिळत आहे. शिव ठाकरेच्या बाजूलाच राज ठाकरे उभे असून त्यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आहे. या भेटीनंतर शिवने आनंद व्यक्त केला. “राजसाहेब नेहमीच मराठी मुलांचं समर्थन करतात आणि त्यांची मदत करतात. एक मराठी मुलगा हिंदी बिग बॉसमध्ये जातो. त्याचे देशभर चाहते तयार होतात. ही गोष्ट राज ठाकरे यांना आवडली म्हणून त्यांनी मला बोलावून घेतलं, माझं अभिनंदन केलं,” अशी प्रतिक्रिया शिवने या भेटीनंतर दिली.

राज ठाकरे यांनी शिवला बिग बॉससाठी आणि भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या भेटीनंतर शिव ठाकरे मनसेत प्रवेश करणार का असा प्रश्न विचारल्यावर तो म्हणाला, “मी पक्ष किंवा राजकारणाशिवाय त्यातील लोकांना महत्त्व देतो.” शिव ठाकरे लवकरच खतरों के खिलाडी या शोच्या नव्या सिझनमध्ये झळकणार आहे.