
Mouni Roy : बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय हिने हरियाणातील करनाल येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात घडलेल्या अत्यंत धक्कादायक आणि त्रासदायक घटनेबाबत उघडपणे भाष्य केले आहे. कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या काही व्यक्तींनी, ज्यामध्ये एका वृद्ध व्यक्तीने मौनी रॉयसोबत छेडछाड केल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे. मौनीने तिचा संपूर्ण अनुभव इंस्टाग्राम स्टोरीजद्वारे शेअर केला असून, या घटनेनंतर ती मानसिकदृष्ट्या व्यथित आणि अपमानित झाल्याचे तिने सांगितले आहे.
मौनी रॉयने सांगितले की, कार्यक्रम सुरू होताच जेव्हा ती मंचाकडे जात होती. तेव्हा काही पुरुषांनी फोटो काढण्याच्या बहाण्याने तिच्या कंबरेला हात लावला. याबाबत तिने स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.
मौनीने इन्स्टाग्रामवर लिहिले की, शनिवारी करनालमध्ये एक कार्यक्रम होता. काही माणसाच्या वागणुकीमुळे मी अत्यंत निराश झाले, विशेषतः त्या दोन ‘अंकल’ लोकांमुळे, जे वयाने आजोबा-आजींच्या वयाचे होते. मी मंचाकडे जात असताना, त्या वृद्ध माणसाने आणि त्यांच्या कुटुंबातील पुरुषांनी फोटो काढण्याच्या नावाखाली माझ्या कंबरेवर हात ठेवला. मी नम्रपणे सर, कृपया हात हटवा असे सांगितले पण त्यांना ते अजिबात आवडले नाही.
मौनीच्या मते, मंचावर पोहोचताच परिस्थिती आणखी गंभीर झाली. ती म्हणाली, मंचावर पोहोचल्यावर अजूनच भयानक प्रकार घडला. दोन वृद्ध थेट माझ्यासमोर उभे राहून अश्लील कमेंट्स करत होते, घाणेरडे इशारे करत होते आणि शिव्या देत होते. मी आधी सौम्यपणे त्यांना थांबण्याचा इशारा केला. त्यानंतर त्यांनी माझ्यावर गुलाब फेकायला सुरुवात केली. या प्रकारामुळे ती परफॉर्मन्सदरम्यान मंच सोडून बाहेर जाण्याच्या विचारात होती. मात्र, काही क्षणांनी ती पुन्हा मंचावर परतली आणि आपली परफॉर्मन्स पूर्ण केला.
आयोजकांची उदासीनता?
मौनीने आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला. ती म्हणाली की, इतका गोंधळ असूनही ना आयोजकांनी, ना कुटुंबातील इतर सदस्यांनी त्या व्यक्तींना रोखण्याचा प्रयत्न केला. ‘ते लोक थांबले नाहीत आणि कुणीही त्यांना पुढून हटवले नाही. हे पाहून मला प्रचंड धक्का बसला असं तिने म्हटलं आहे. या घटनेनंतर मौनी रॉयने मनोरंजनसृष्टीत नव्याने येणाऱ्या मुलींबाबत गंभीर चिंता व्यक्त केली.
ती म्हणाली, जर माझ्यासारख्या कलाकाराला हे सगळं सहन करावं लागत असेल तर नव्या मुलींचं काय होत असेल याची मी कल्पनाही करू शकत नाही. मी अपमानित आणि धक्क्यात आहे. या असह्य वर्तनाविरोधात प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी माझी मागणी आहे असं तिने म्हटलं आहे.