
‘कुमकुम भाग्य’ या मालिकेत सहाय्यक भूमिका ते बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये मुख्य भूमिका साकारण्यापर्यंत.. अभिनेत्री मृणाल ठाकूरने बराच संघर्ष केला. दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर तिने हे यश मिळवलं आहे. परंतु अशातच एका जुन्या व्हिडीओमुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या व्हिडीओमध्ये मृणाल अभिनेत्री बिपाशा बासूच्या शरीरयष्टीवरून टिप्पणी करताना दिसली. एका अर्थाने बिपाशाचं दिसणं पुरुषी असल्याचं तिने म्हटलं होतं. मृणालची ही टिप्पणी काही नेटकऱ्यांना अजिबात आवडली नाही. अनेकांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. अशातच आता खुद्द बिपाशानेही नाव न घेता मृणालला सडेतोड उत्तर दिलं आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये मृणालसोबत एक व्यक्ती बसलेली आहे आणि ती बिपाशाचं कौतुक करत असते. त्यावर मृणाल त्याला म्हणते, “मी बिपाशापेक्षा चांगली आहे. तुला अशा मुलीशी लग्न करायचंय का, जी पुरुषी दिसते आणि तिचे मसल्स असतील? जा तू बिपाशा बासूशी लग्न कर. मी तिच्यापेक्षा कितीतरी पटींनी चांगली आहे.” हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बिपाशाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सशक्त महिलांबद्दलची आहे.
‘सशक्त महिला एकमेकींना सहाय्य करतात आणि वर नेतात. सुंदर महिलांनी त्यांचे स्नायू बळकट करण्याची आवश्यकता आहे. आपण मजबूत असायला हवं. बळकट स्नायूमुळे तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं. महिलांनी मजबूत किंवा बळकट दिसू नये, या जुन्या विचाराला मोडून टाका. महिलांनी शारीरिकदृष्ट्या नाजूकच असायला हवं, हा अत्यंत जुना विचार आहे’, अशा आशयाची पोस्ट बिपाशाने शेअर केली आहे.
मृणाल ठाकूरच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, ती नुकतीच ‘सन ऑफ सरदार 2’मध्ये झळकली. यामध्ये तिने रवी किशन, नीरु बाजवा, चंकी पांडे, संजय मिश्रा, कुब्रा सैत, दीपक डोबरियाल आणि विंदू दारा सिंह यांच्यासोबत काम केलंय. बॉलिवूडसोबत मृणालने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘सीता रामम’, ‘नाना’ यांसारख्या चित्रपटांमधून तिला लोकप्रियता मिळाली आहे. तर दुसरीकडे बिपाशाने बॉलिवूडचा एक काळ गाजवला होता. सध्या ती चित्रपटांमध्ये फारशी सक्रिय नाही. बिपाशाने अभिनेता करण सिंह ग्रोवरशी लग्न केलंय.