जावेद जाफरीसह पत्नीची कोट्यवधींची फसवणूक; आरोपीला ठोकल्या बेड्या, नेमकं प्रकरण काय?
प्रसिद्ध अभिनेता जाफेद जाफरी आणि त्याची पत्नी हबीबा जाफरी यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. हाऊसिंग प्रकल्पाच्या नावाखाली हबीबाकडून या आरोपीने पैसे उकळले होते.

अभिनेता जावेद जाफरी आणि त्याची पत्नी हबीबा यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. निशित पटेल असं या आरोपीचं नाव असून त्याच्यावर 17.5 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा आरोप आहे. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने निशितला बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यावर निशित पटेलने आरोप केले होते. महेश पाटील यांच्या सांगण्यावरून मी पैसे जमा केले, असा दावा करणाऱ्या निशितवर आता कारवाई झाली आहे. हाऊसिंग प्रकल्पाच्या नावाखाली पैसे उकळून आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार जावेद जाफरीची पत्नी हबीबाने दाखल केली होती. आज (गुरुवार) निशितला कोर्टात हजर केलं जाणार आहे.
एका मोठ्या फसवणुकीच्या प्रकरणात निशित पटेलचा सहभाग असल्याचं सिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक तपास केला आणि त्यानंतर त्याला अटक केली. पोलिसांनी या प्रकरणातील रकमेची पुष्टी केली असली तरी त्यांनी अद्याप संपूर्ण कार्यपद्धती किंवा तपास सुरू असलेल्या व्यवहारांचं स्वरुप उघड केलेलं नाही. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जाईल, तसतसे त्याचे अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.
मुंबईतील आर्थिक फसवणुकीची प्रकरणं अनेकदा प्रॉपर्टी सेल किंवा इकॉनॉमिक ऑफसेन्स विंगसारख्या विशेष युनिट्सद्वारे हाताळली जातात. विशेषकरून जेव्हा त्यात मोठ्या रकमेचे व्यवहार किंवा सेलिब्रिटींशी संबंधित व्यक्तींचा समावेश असतो. दरम्यान हबीबा जाफरीने याप्रकरणी अद्याप कोणतंही अधिकृत निवेदन जारी केलेलं नाही. मोठ्या रकमेचे आर्थिक व्यवहार करताना जनतेनं सावधगिरी बाळगावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
जावेद जाफरीने जेबा बख्तियारशी पहिलं लग्न केलं होतं. जेबा ही पाकिस्तानी अभिनेत्री होती आणि ऋषी कपूर यांच्यासोबत ‘हिना’ या चित्रपटात तिने काम केलं होतं. 1989 मध्ये त्यांनी लग्न केलं आणि 1990 मध्ये ते विभक्त झाले. त्यानंतर जेबाने गायक अदनान सामीशी 1993 मध्ये लग्न केलं. 1997 मध्ये जेबा आणि अदनान यांच्याही संसारात फूट पडली. जेबाला घटस्फोट दिल्यानंतर जावेदने हबीबाशी दुसरं लग्न केलं. या दोघांना तीन मुलं आहेत. मिजान, अलाविया आणि अब्बास अशी त्यांची नावं आहेत. त्यापैकी मिजान जाफरीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.