
Munmun Dutta : टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय आणि दीर्घकाळ चालणाऱ्या मालिकांपैकी एक असलेली ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरांमध्ये पोहोचले असून मालिकेतील केमिस्ट्री, विनोद, मस्ती आणि हलकीफुलकी नोकझोंक प्रेक्षकांना खळखळून हसवते. मात्र, या शोमधील सर्वात मजेशीर आणि लक्षवेधी गोष्ट म्हणजे जेठालालचे बबिता जींवरचे निरागस प्रेम आणि छेडछाड ही प्रेक्षकांना प्रचंड आवडते.
दरम्यान, आता या मालिकेतील बबिता जी अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ताबाबत एक महत्त्वाची चर्चा रंगू लागली आहे. मुनमुन दत्ता लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत. यावर अखेर खुद्द मुनमुन दत्ताने मौन सोडलं आहे.
पॉडकास्टमध्ये मोठा खुलासा
अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये मुनमुन दत्ताने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोकळेपणाने संवाद साधला. प्रेम, ब्रेकअप आणि लग्न यांसारख्या विषयांवर तिने आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘तू लग्न कधी करणार?’ असा प्रश्न विचारण्यात आला असता मुनमुन दत्ता म्हणाली, ‘मी लग्न करेन की नाही, याबाबत माझं मत अजूनही पूर्णपणे स्पष्ट नाही. जर माझ्या नशिबात लग्न लिहिलं असेल तर ते नक्की होईल. पण मी लग्नाच्या मागे धावणारी मुलगी नाही’.
पुढे म्हणाली, ‘माझा नवरा असा असायलाच हवा किंवा मी अशाच व्यक्तीशी लग्न करणार, असं ठरलेलं स्वप्न माझं कधीच नव्हतं’ असं तिने म्हटलं. मात्र, तिला कोणत्या प्रकारचे पुरुष आवडतात, यावरही तिने स्पष्ट मत मांडलं.
मुनमुन दत्ताला कसा नवरा पाहिजे?
मुनमुनने सांगितलं की, ‘मला सुंदर पुरुष आवडतात, ज्यांचं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे, जे समजूतदार आहेत आणि आर्थिकदृष्ट्याही सक्षम आहेत. मी खोटं बोलत नाही त्यामुळे मला जोडीदारात या सगळ्या गोष्टी हव्या आहेत.’
मुनमुन दत्ताने यावेळी तिच्या आवडी-निवडींबाबत आणखी एक खुलासा केला. तो म्हणजे, सध्या तिला कोरियन कलाकार खूप आवडतात. परदेशी व्यक्तीशी लग्न करण्याच्या प्रश्नावर ती म्हणाली, ‘फॉरेनर्ससोबत माझी बॉन्डिंग चांगली आहे. त्यांचा जन्म एका ठिकाणी होतो, ते राहतात दुसऱ्या ठिकाणी, त्यामुळे त्यांची विचारसरणी अधिक विकसित असते. ते महिलांशी खूप आदराने आणि प्रेमाने वागतात. याला अनेक महिलाही सहमत असतील’ असं ती म्हणाली.