
अभिनेत्री सारा अली खान, नुशरत भरुचा या अशा अभिनेत्रींपैकी आहेत, ज्या मुस्लीम असूनही भोलेनाथ म्हणजेच देव शंकरावर त्यांची खूप श्रद्धा आहे. सारा अनेकदा मंदिरात जाऊन महादेवांची पूजा करताना दिसते. केदारनाथपासून उज्जैनमधील महाकालेश्वरपर्यंत तिने काही ज्योतिर्लिंगांचंही दर्शन घेतलं आहे. नुशरतनेही शंकरावर विशेष श्रद्धा असल्याचं म्हटलं होतं. आता आणखी एका मुस्लीम अभिनेत्रीने तिच्या धार्मिक श्रद्धांविषयी खुलासा केला आहे. हनुमान चालिसा वाचून मनाला शांती मिळते, असं तिने म्हटलंय. त्याचप्रमाणे गायत्री मंत्रदेखील ऐकत असल्याचं तिने सांगितलं आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल 5’ या चित्रपटातील अभिनेत्री नरगिस फाखरी आहे.
45 वर्षीय नरगिस फाखरीचा जन्म न्यूयॉर्कमधील क्वीन्स इथं झाला आणि ती तिथेच लहानाची मोठी झाली. तिच्या वडिलांचं नाव मोहम्मद फाखरी आणि आईचं नाव मेरी फाखरी आहे. नरगिसला आलिया नावाची एक धाकटी बहीणसुद्धा आहे. नरगिस मुस्लीम असूनही हिंदू धर्मातील पूजाविधी करून मनाला शांती मिळत असल्याचा खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला.
‘न्यूज 9 लाइव्ह’शी बोलताना नरगिस म्हणाली, “मी धार्मिक नाही, पण मी अध्यात्मिक आहे. मला सर्व धर्मांबद्दल जाणून घ्यायला आवडतं. मी अशी व्यक्ती आहे, जिच्या घरात तुम्हाला गायत्री मंत्रदेखील ऐकायला मिळेल. मला गायत्री मंत्र, हनुमान चालिसा ऐकायला आणि वाचायला आवडतं.” इतकंच नव्हे तर वर्षातून दोन वेळा नऊ दिवसांचा उपवासदेखील करत असल्याचं तिने सांगितलं आहे. या उपवासादरम्यान ती काहीच खात नाही, फक्त पाणी पिते. हे खूप कठीण असलं तरी उपवास केल्यानंतर एकाग्रता अधिक वाढल्याचं निरीक्षण तिने नोंदवलंय.
“मला सतत कामाचा तणाव जाणवल्यास मी हनुमान चालिसा ऐकते. मला अनेकजण विचारतात की तू कोणत्या प्रकारची गाणी ऐकतेस. तेव्हा माझं उत्तर ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण मी विविध मंत्र ऐकते. मी हनुमान चालिसा आणि गायत्री मंत्र ऐकते, त्यामुळे चिंता कमी होते”, असंही ती पुढे म्हणाली.