
सिनेविश्वात दरवर्षी हजारो चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात. परंतु त्यापैकी काही चित्रपट फक्त प्रेक्षकांचं मनोरंजनच करत नाहीत, तर त्यांची मनंही जिंकून घेतात. अशा चित्रपटांची कथा जरी साधी असली तरी आयुष्याशी संबंधित काही महत्त्वाचे संदेश त्यात दडलेले असतात. नुकताच असाच एक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आता तो ओटीटीवर स्ट्रीमिंगसाठी सज्ज झाला आहे. या मल्याळम चित्रपटाला थिएटरमध्ये दमदार प्रतिसद मिळाला होता. त्याला प्रेक्षक-समीक्षकांकडून चांगली रेटिंगसुद्धा मिळाली होती. कमाईच्या बाबतीत जरी हा चित्रपट मागे राहिला असला तरी ओटीटीवर हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
या चित्रपटाचं नाव आहे ‘हृदयपूर्वम’. सत्यन अंथिकड दिग्दर्शित हा चित्रपट 28 ऑगस्ट 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला थिएटरमध्ये महिनाही झाला नाही, इतक्यात तो ओटीटीवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट जियो हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. नुकतीच यासंदर्भात घोषणा झाली. येत्या 26 सप्टेंबर रोजी हा चित्रपट जियो हॉटस्टारवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘हृदयपूर्वम’ या चित्रपटाची कथा श्रीमंत बिझनेसमन संदीप बालकृष्णन (मोहनलाल) याच्याभोवती फिरते. अत्यंत तापट स्वभाव असलेला संदीप केरळातील कोच्चीमध्ये क्लाऊड किचन चालवतो. श्रीमंती असली तरी तो त्याच्या आयुष्यात खूप एकटा असतो आणि आपल्या भावनांना नेहमी लपवण्याचा प्रयत्न करतो. एकेदिवशी त्याला हार्ट ट्रान्सप्लांटची गरज असते आणि त्याला एका आर्मी ऑफिसरचं हृदय दिलं जातं. हृदयाला फक्त एक अवयव समजला जाणारा संदीप हार्ट ट्रान्सप्लांटच्या डोनरच्या मुलीच्या साखरपुड्यात पोहोचतो. डोनरच्या मुलीचा साखरपुडा मोडतो आणि तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसतो. अशावेळी परिस्थिती अशी बनते की त्याला त्यांच्या घरात काही काळासाठी राहावं लागतं. त्यानंतर त्याच्या आयुष्यात जे बदल होतात, त्याचीच ही कथा आहे.
या चित्रपटाला IMDb वर 7.1 रेटिंग मिळाली आहे. ‘हृदयपूर्वम’ या चित्रपटात मोहनलाल यांच्यासोबत मालविका मोहनन, संगीता माधवन नायर, संगीत प्रताप, बेसिल जोसेफ, मीरा जास्मीन, अँटनी पेरुंबवूर यांच्याही भूमिका आहेत.