Nana Patekar: ..तर माझं अस्तित्वच संपेल..; नाना पाटेकर यांच्या मुलाची भावनिक साद, घेतली मोठी शपथ
Nana Patekar: नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा मल्हार पाटेकरने भावना व्यक्त केल्या आहेत. माझ्यासाठी नानासाहेब हे नेहमीच नानासाहेब राहतील, असं तो म्हणाला. तसंच त्याने नानांच्या चाहत्यांनाही भावनिक साद दिली आहे.

Nana Patekar: नाना पाटेकर यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांचा मुलगा मल्हार पाटेकरने नानांनी सुरू केलेले सामाजिक उपक्रम पुढे चालू ठेवून त्यांचा वापसा जपण्याचा निर्धार केला आहे. नाना पाटेकर यांच्या अंत्यसंस्कारानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मल्हार म्हणाला, “माझ्या वडिलांची कामगिरीच त्यांना लोकांच्या मनात जिवंत ठेवेल. वडिलांची दूरदृष्टी सिनेमाच्याही पलीकडे होती. नानासाहेबांचं समाजासाठीचं योगदान अतुलनीय होतं. नानासाहेबांप्रमाणेच आपण सर्वजण एक दिवस हे जग सोडून जाणार आहोत. पण त्यांची कामगिरी आणि त्यांनी केलेलं कार्य त्यांच्यासारख्या व्यक्तीला अमर बनवते. मानवतेच्या नावाने एकत्र येऊया आणि जगाच्या भल्यासाठी काम करुया, या एकाच विचारावर नेहमी त्यांचा विश्वास होता.”
सामाजिक कार्य सुरूच राहील
नाना पाटेकर यांनी त्यांच्या सेवाभावी संस्थांसाठी जी उद्दिष्ट्ये निश्चित केली होती, ती पूर्ण करण्यासाठी कुटुंब कार्यरत राहील, असं आश्वासन मल्हारने यावेळी दिलं. “नाम फाऊंडेशन असो किंवा निर्मला गजानन फाऊंडेशन.. पुढे जे काम करायचं आहे, ते सुरूच राहिलं पाहिजे. त्यांच्या मनात असलेल्या कल्पना पुढे नेल्या पाहिजेत. आम्ही आमचं आयुष्य ती उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी घालवू आणि त्यानंतरही ते सुरूच ठेवलं पाहिजे. जोपर्यंत आम्ही या कार्यांसाठी काम करत राहू, तोपर्यंत सर्व काही ठीक होईल”, असं तो पुढे म्हणाला.
“नानासाहेब गेले हे जर मी स्वीकारलं, तर..”
नाना पाटेकरांबद्दल बोलताना मल्हार यावेळी भावूक झाला. “माझ्यासाठी नानासाहेब हे नेहमीच नानासाहेब राहतील. नानासाहेब गेले हे जर मी स्वीकारलं, तर माझंच अस्तित्त्व संपेल. म्हणून माझ्यासाठी नानासाहेब हे नानासाहेबच राहतील. अशी कर्तृत्ववान व्यक्ती कधीच खऱ्या अर्थाने नाहीशी होत नाही. त्यांच्या कार्यामुळे ते अमर झाले आहेत. याबद्दल दुमत असूच शकत नाही”, अशा शब्दांत तो व्यक्त झाला.
यावेळी मल्हारने असाही खुलासा केला की नाना पाटेकर यांनी दोन्ही संस्थांमधील जबाबदाऱ्या आधीच पुढच्या पिढीकडे सोपवल्या होत्या. “तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण त्यांनी उभारलेलं सर्वकाही पुढच्या पिढीकडे सोपवलं होतं. त्यांनी हे नाम फाऊंडेशन आणि निर्मला गजानन फाऊंडेशन या दोन्हींच्या बाबतीत केलं होतं. त्यांना जबाबदाऱ्या इतरांना सोपवून दुसरीकडे कुठेतरी शून्यापासून पुन्हा सुरुवात करायची होती. त्यांच्या मनात हेच होतं. माझी एवढीत आशा आहे की हे कार्य पुढे चालू राहील. मी तुम्हा सर्वांनाही या प्रयत्नांमध्ये सामील होण्याचं आवाहन करतो”, असं मल्हारने सांगितलं.
पुण्याजवळील डोणजे गावात नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी राजकीय आणि कलाक्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते.