
अभिनेत्री नुशरत भरुचाने उज्जैनमधील महाकाल मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. मुस्लीम समाजाने तिच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून बरेली इथल्या एका मौलवींनी नुशरतवर गंभीर आरोपसुद्धा केले आहेत. नुशरतने महाकाल मंदिरात पूजा करून महापाप केल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे तिला आता मंदिरात गेल्याबद्दल पश्चात्ताप करावा लागेल, असंही मौलवी शहाबुद्दीन रझवी यांनी म्हटलंय. रझवी हे अखिल भारतीय मुस्लीम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते अनेकदा त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. यावेळी त्यांनी नुशरत भरुचाला लक्ष्य केलंय.
नुशरत नुकतीच मध्य प्रदेशातील उज्जैन इथल्या महाकाल मंदिरात दर्शनासाठी गेली होती. या दर्शनानंतर तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर मुस्लीम समाजातील नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. याविषयी मौलाना शहाबुद्दीन म्हणाले, “नुशरत भरुचा उज्जैनमधल्या महाकाल मंदिरात गेली. तिथे तिने पूजा केली आणि शिवलिंगावर पाणी अर्पण केलं. तिथल्या धार्मिक परंपरांचं तिने पालन केलं. इस्लाम या सर्व गोष्टींना परवानगी देत नाही. शरियानुसार नुशरतने आता पश्चात्ताप करावा, इस्तिगफर करावी आणि कलमाचं पठण करावं. तिचं हे कृत्य इस्लामच्या तत्त्वांविरोधत आहे. त्यामुळे ती शरियाच्या कक्षेत आली आहे आणि ती गंभीर पापाची दोषी बनली आहे. तिला पश्चात्ताप करणं आवश्यक आहे.”
याप्रकरणी अद्याप नुशरतची कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही. याआधी शहाबुद्दीन रझवी यांनी मुस्लीम समुदायाला नवीन वर्ष साजरं करून नये असं आवाहन करणारा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यांनी याला फालतूचा खर्च आणि शरिया कायद्यानुसार नवीन वर्ष साजरं करणं बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं. त्यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं होतं. त्यांनी या व्हिडीओत असंही सांगितलं होतं की इस्लामिक कॅलेंडर वर्षाची सुरुवात मोहरम महिन्यापासून होते. 31 डिसेंबर किंवा 1 जानेवारी रोजी नवीन वर्ष साजरा करणं ही एक युरोपियन परंपरा आहे. न्यू इअर सेलिब्रेशनच्या नावाखाली 31 डिसेंबरच्या रात्री अश्लीलता, आवाज, गोंधळ, नाच-गाणं केलं जातं. शरिया कायद्यात या गोष्टींना परवानगी नाही, असं त्यांनी म्हटलं होतं.