फक्त 2 मिनिटांमध्ये तयार झाली या कव्वालीची धून, 30 वर्षांपासून सुपरहिट, शेवटपर्यंत ऐकतात लूक

अवघ्या 2 मिनिटांत तयार झाली होती नुसरत फतेह अली खान यांच्या प्रसिद्ध कव्वालीची धून. इतकी सुंदर की 10 मिनिटांची असून देखील लोक शेवटपर्यंत ऐकतात.

फक्त 2 मिनिटांमध्ये तयार झाली या कव्वालीची धून, 30 वर्षांपासून सुपरहिट, शेवटपर्यंत ऐकतात लूक
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 13, 2026 | 4:32 PM

सुफी संगीत आणि कव्वालीच्या दुनियेत आपल्या दमदार आवाजाने वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ गायक नुसरत फतेह अली खान आजही संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवतात. त्यांच्या आवाजातील भावपूर्ण गाणी आणि कव्वाली ऐकताना श्रोते मंत्रमुग्ध होतात. ‘दम मस्त कलंदर’, ‘तुम्हें दिल्लगी भूल जानी पड़ेगी’ आणि ‘आफरीन आफरीन’ यांसारख्या रचनांनी त्यांना जगभरात लोकप्रियता मिळवून दिली. विशेष म्हणजे, त्यांच्या गाजलेल्या ‘आफरीन आफरीन’ या कव्वालीच्या निर्मितीमागे एक रंजक किस्सा आहे.

1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आफरीन आफरीन’ या कव्वालीने संगीतविश्वात विशेष लोकप्रियता मिळवली. या कव्वालीचे बोल प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी लिहिले होते. अनेक गायकांनी या गाण्याची वेगवेगळ्या प्रकारे पुनर्निर्मिती केली; मात्र नुसरत फतेह अली खान यांच्या आवाजातील मूळ आवृत्ती आजही श्रोत्यांच्या पसंतीस उतरते.

Loading...

अवघ्या दोन मिनिटांत तयार झाली धून

जावेद अख्तर यांनी ‘इंडियन आयडॉल’ या कार्यक्रमात हजेरी लावली असताना या कव्वालीच्या निर्मितीशी संबंधित एक खास आठवण सांगितली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘आफरीन आफरीन’च्या निमित्ताने त्यांची नुसरत फतेह अली खान यांच्याशी एका हॉटेलमध्ये भेट झाली होती. दोघेही या गाण्यावर काम करण्यासाठी एकत्र बसले होते.

जावेद अख्तर यांनी कव्वालीची सुरुवातीची ओळ नुसरत फतेह अली खान यांना ऐकवली. त्यानंतर नुसरत यांनी कोणत्याही वाद्याचा वापर न करता, केवळ तालाच्या आधारे धून तयार करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, अवघ्या दोन मिनिटांत या गाण्याची सुंदर धून तयार झाली अशी आठवण जावेद अख्तर यांनी सांगितली होती.


आजही कायम आहे ‘आफरीन आफरीन’ची जादू

‘आफरीन आफरीन’ ही कव्वाली साधारण दहा मिनिटांची असून, तिचे शब्द, संगीत आणि नुसरत फतेह अली खान यांचा भारदस्त आवाज यांमुळे ती आजही संगीतप्रेमींच्या आवडीची आहे. काळ बदलला, संगीताच्या शैली बदलल्या, मात्र या कव्वालीची लोकप्रियता कायम आहे. नुसरत फतेह अली खान यांच्या अद्वितीय गायकीची आणि जावेद अख्तर यांच्या शब्दांची जादू अनुभवायला मिळणारी ही रचना आजही चाहत्यांच्या मनात विशेष स्थान टिकवून आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us