या अभिनेत्रीने 17 व्या वर्षी दिलेला सुपरहिट चित्रपट, 44 वर्षांपूर्वीचा ऑडिशनचा व्हिडीओ व्हायरल

वयाच्या 16-17 व्या वर्षी पद्मिनी कोल्हापुरेंनी दिली होती 'प्रेम रोग'साठी ऑडिशन. 44 वर्षांपूर्वीचा ऑडिशन घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल.

या अभिनेत्रीने 17 व्या वर्षी दिलेला सुपरहिट चित्रपट, 44 वर्षांपूर्वीचा ऑडिशनचा व्हिडीओ व्हायरल
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 13, 2026 | 4:02 PM

हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी अगदी लहान वयातच अभिनयाच्या जगात पाऊल ठेवले. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून त्यांनी बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. आता त्यांच्या गाजलेल्या ‘प्रेम रोग’ या चित्रपटातील एका खास आठवणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पद्मिनी चित्रपटातील एका महत्त्वाच्या प्रसंगासाठी ऑडिशन देताना दिसत आहेत.

1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम रोग’ या चित्रपटात पद्मिनी कोल्हापुरे यांनी मनोरमा ही भूमिका साकारली होती. चित्रपटातील एका प्रसंगात पतीच्या निधनानंतर मनोरमाचे केस कापले जातात. यावेळी ती आपल्या आईला, ‘मी केस कापणार नाही, यात माझी काय चूक आहे?’ असे म्हणताना दिसते. हा प्रसंग अत्यंत भावनिक असून, त्यासाठी पद्मिनी यांना विशेष ऑडिशन द्यावे लागले होते. त्यावेळी त्या अवघ्या 16-17 वर्षांच्या होत्या.

Loading...

या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कपूर यांनी केले होते. याआधी पद्मिनी यांनी त्यांच्या ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. या चित्रपटात त्यांनी झीनत अमान यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. त्यामुळे ‘प्रेम रोग’मधील मनोरमाच्या भूमिकेसाठी राज कपूर यांनी त्यांचा विचार केला होता.

तीन वेगवेगळ्या लूकमध्ये द्यावी लागली ऑडिशन

एका मुलाखतीत पद्मिनी यांनी सांगितले होते की, राज कपूर यांनी त्यांची ऑडिशन अत्यंत बारकाईने घेतली होती. मनोरमाचे पात्र चित्रपटात तीन वेगवेगळ्या टप्प्यांतून जाते. सुरुवातीला ती श्रीमंत घरातील चंचल आणि खोडकर मुलगी असते. त्यानंतर तिचे लग्न होते आणि ती नववधूच्या रूपात दिसते. मात्र, पतीच्या निधनानंतर तिचे आयुष्य पूर्णपणे बदलते. तिला विधवेचे जीवन जगण्यास आणि समाजातील कठोर रूढी पाळण्यास भाग पाडले जाते.

या तिन्ही टप्प्यांतील अभिनय आणि लूकसाठी पद्मिनी यांची वेगवेगळी चाचणी घेण्यात आली होती. त्यांनी तिन्ही परीक्षा यशस्वीपणे पार केल्यानंतर त्यांची मनोरमाच्या भूमिकेसाठी निवड झाली.

या चित्रपटाने पद्मिनी कोल्हापुरे यांना अभिनेत्री म्हणून नवी ओळख मिळवून दिली. त्यांच्या दमदार अभिनयासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारही मिळाला होता. त्यामुळे आजही ‘प्रेम रोग’ हा त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा चित्रपट मानला जातो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us