Pahalgam Attack: ‘अबीर गुलालला’ बायकॉट करण्याची मागणी; पाकिस्तानी अभिनेता फवाद अन् वाणी कपूरवर संताप

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर, फवाद खान आणि वाणी कपूर यांच्या 'अबीर गुलाल' या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी केली जात आहे. पाकिस्तानी कलाकार फवाद खानमुळे हा तीव्र विरोध करण्यात येत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाच्या विरोधात अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. हल्ल्याचा निषेध म्हणून चित्रपटाचा बहिष्कार करण्याची मागणी केली जात आहे आणि यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Pahalgam Attack: अबीर गुलालला बायकॉट करण्याची मागणी; पाकिस्तानी अभिनेता फवाद अन् वाणी कपूरवर संताप
Fawad Khan and Vaani Kapoor film Abir Gulal
Image Credit source: instagram
| Updated on: Apr 23, 2025 | 3:06 PM

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. पर्यटकांना त्यांची नावे आणि धर्म विचारून दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचं क्रूर सत्य समोर आलं. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. भविष्यात कोणीही भारतीयांवर अशा प्रकारे अत्याचार करण्याचे धाडस करू नये म्हणून देशवासीय भारत सरकारला दहशतवाद्यांना पकडून कठोरात कठोर शिक्षा करण्याचे आवाहन करत आहेत.

बॉलिवूडपासून ते मराठी कलाकारांपर्यंत सर्वांनीच या हल्ल्याबाबत निषेध 

बॉलिवूडपासून ते मराठी कलाकारांपर्यंत सर्वांनीच या हल्ल्याबाबत निषेध , राग व्यक्त केला आहे. पण आता या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा परिणाम वाणी कपूर आणि फवाद खान यांच्या आगामी चित्रपट ‘अबीर गुलाल’ वरही पडताना दिसत आहे . हा हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानविरोधात सगळीकडेच मोर्चे आणि आंदोलन सुरु आहेत. त्यातच आता ‘अबीर गुलाल’वर बहिष्कार टाकण्याची मागणी होऊ लागली आहे.

‘अबीर गुलाल’ चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी का होत आहे?

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. ‘अबीर गुलाल’ चित्रपटाच्या घोषणेपासून काहीजण त्याचा निषेध करत आहेत, परंतु पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर लोकांचा रोष आणखी शिगेला पोहोचला आहे. आणि आता तर चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. या हल्ल्याचा निषेध म्हणून ‘अबीर गुलाल’ चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे.


सोशल मीडियावर पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि वाणी कपूरवर संताप 

एका युजरने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले आहे की, ‘पाकिस्तानी कलाकारांवर आणि त्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घाला… एकीकडे हे लोक आपल्या लोकांना मारतात आणि दुसरीकडे बॉलिवूड या लोकांसह चित्रपट बनवते.अबीर गुलालावर बहिष्कार घालण्याची आमची मागणी आहे”, तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, ‘अबीर गुलालमध्ये पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आहे, ज्याच्या लोकांनी आपल्या देशातील लोकांना मारले आहे. फवाद खानच्या अबीर गुलाल या चित्रपटाला आमचा विरोध आहे.”, एवढंच नाही तर फवादसोबत काम करणाऱ्या वाणी कपूरवरही संताप व्यक्त केला जात आहे.

चित्रपटाच्या अडचणी वाढणार

वाणी कपूर आणि फवाद खान यांचा ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट 9 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. पण ‘अबीर गुलाल’ला ज्या पद्धतीने विरोध होत आहे ते पाहता या चित्रपटाच्या अडचणी आता चांगल्याच वाढणार असं दिसतंय. महाराष्ट्रातील लोक आधीच अबीर गुलालाचा निषेध करत होते.पण या हल्ल्यानंतर तर हा निषेध अजूनच तीव्र झाला आहे.