
फिल्म किंवा टेलिव्हिजन इंडस्ट्रीत दिसण्याला फार महत्त्व दिलं जातं. त्यामुळे असंख्य अभिनेते आणि अभिनेत्री विविध ट्रिटमेंट्सना बळी पडतात. फिलर्स, बोटॉक्स यांसारखे ट्रिटमेंट्स आता सर्वसामान्य झाले आहेत. अशातच आता कलाकारांमध्ये गोरं दिसण्याची खूप क्रेझ असल्याचा खुलासा एका अभिनेत्रीने केला आहे. ‘पंचायत’ या लोकप्रिय वेब सीरिजमध्ये झळकलेली अभिनेत्री तृप्ती साहुने सांगितलं की, टीव्ही इंडस्ट्रीतील अनेकांना गोरं दिसण्याचं वेड लागलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.
‘डिजिटल कमेंट्री’ला दिलेल्या मुलाखतीत तृप्तीला विचारण्यात आलं की आजकाल अचानक लोक गोरे दिसू लागतात. यामागचं कारण काय असतं? तुलाही कधी त्यावरून ऐकावं लागलं का? या प्रश्नाचं उत्तर देताना तृप्ती म्हणाली, “गोरं दिसण्यासाठी हे कर, ते कर.. असे सल्ले मला अनेकांकडून मिळाले. 2018 मध्ये माझ्या ओळखीच्या एका मुलीने मला इंजेक्शन्सची ऑफर दिली होती. ती मला म्हणाली की, माझ्याकडून इंजेक्शन्स घे, मी 25 हजार रुपयांना देतेय, गोरी होशील. मी तिला म्हटलं की, गोरं का व्हायचंय?”
“मी लहानपणीच एक गोष्ट शिकले. मला नेहमी म्हटलं जायचं की, ही नाकीडोळी सुंदर आहे, पण फक्त हिचा रंग गोरा असायाला पाहिजे होता. त्यांना पण मी हाच सवाल करायचे की, गोरं झाल्यावर काय होईल? जेव्हा तुम्ही असा प्रश्न विचारता, तेव्हा समोरचा त्यापुढे काय म्हणू शकतो? मी त्या मैत्रिणीलाही असाच प्रश्न केला. त्यावर ती म्हणाली की, मी तर फक्त सांगतेय. मी तिला स्पष्ट सांगितलं की, मला असे कोणतेच प्रॉडक्ट्स नकोत. तिनेच मला सांगितलं होतं की लोखंडवालामधल्या सर्व मुलींनी तिच्याकडून इंजेक्शन्स घेतले होते”, असं तृप्तीने स्पष्ट केलं.
एका मालिकेतल्या अभिनेत्यानेही याविषयीचा खुलासा केल्याचं तृप्तीने पुढे सांगितलं. “एका डॉक्टरने त्याला गोरं होण्याचं औषध दिलं होतं. लोकांची मानसिकता अशी झाली आहे की, तुम्ही फक्त गोरे व्हा, तुम्हाला काम आपोआप मिळून जाईल. त्यामुळे जे गोरे नाहीत, ते अशा ट्रिटमेंट्सला बळी पडतात. जोपर्यंत तुम्हील स्वत:ला जसे आहात तसे स्वीकारत नाहीत, तोपर्यंत तुमचा न्यूनगंड जाणार नाही.”