
‘परम सुंदरी’ या चित्रपटाचा टीझर जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा पहिल्यात दृष्टीत तो प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटाचं संगीत आणि केरळमधील नयनरम्य लोकेशन्स पाहून अनेकांना असं वाटलं होतं की, ‘परम सुंदरी’ सुपरहिट ठरेल. टीझर प्रदर्शित झाल्यानंतर दोन महिन्यांनी 12 ऑगस्ट रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेव्हा उत्सुकता आणखी ताणली गेली. ट्रेलर पाहून या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. परंतु ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांनी त्याची तुलना ‘चेन्नई एक्स्प्रेस’शी केली. हा भ्रम चित्रपट पाहिल्यानंतर लगेच दूर होतो. ‘परम सुंदरी’ हा ‘चेन्नई एक्स्प्रेस’सारखा अजिबात नाही. त्या चित्रपटात फार वेगळे एलिमेंट्स पहायला मिळाले आणि इथे निर्मात्यांनी तेवढी मेहनत घेतली नाही. यात आश्चर्याची बाब म्हणजे, या चित्रपटाची कथा तीन लोकांनी मिळून लिहिली आहे. तीन जण मिळूनही या चित्रपटाची कथा तितकी रंजक बनवू शकले नाहीत. याची कथा जरी अंदाज लावता येण्यासारखी असली तरी त्यात आणखी दमदार कामगिरी करता येऊ शकली असती.
या चित्रपटाची कथा खूपच साधी आहे. दिल्लीत राहणारा परम सचदेव (सिद्धार्थ मल्होत्रा) त्याच्या वडिलांची मदत मागतो. मदतीऐवजी त्याचे वडील (संजय कपूर) त्याला एक चॅलेंज देतात. तोच चॅलेंज पूर्ण करण्यासाठी परम त्याच्या जग्गी या मित्रासोबत (मनजोत सिंह) केरळला जातो. तिथे त्याची भेट सुंदरीशी (जान्हवी कपूर) होते. त्यानंतर अशा अनेक घडामोडी घडतात, ज्यामध्ये परम आणि सुंदरी अडकतात. अखेर त्याचा शेवट काय होतो, याचा अंदाज तर तुम्ही वर्तवू शकता.
दोन जण भेटणार, प्रेम होणार.. मग एकतर लग्नानंतर कथेत ट्विस्ट येणार किंवा लग्नाआधी. हा फॉर्म्युला बॉलिवूडच्या अनेक रोमँटिक चित्रपटांमध्ये वापरला गेलाय. पण एक दिग्दर्शक आणि लेखक म्हणून त्याच कथेला अत्यंत रंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर कशी मांडता येणार, यात खरं कौशल्य आहे. प्रेक्षकांना संपूर्ण वेळ खिळवून ठेवता आलं पाहिजे. परंतु दिग्दर्शक तुषार जलोटा इथेच चुकतो.
मध्यांतरापूर्वी कथेला वेग येईपर्यंत सर्वकाही रटाळ वाटू लागतं. मध्यांतरानंतर चित्रपट थोडा रंजक बनवण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु तोपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतो. दिग्दर्शकापेक्षा सिनेमॅटोग्राफरचं कौशल्य मोठ्या पडद्यावर सहज दिसून येतं. केरळमधील सुंदर लोकेशन्स अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने चित्रित केले आहेत.
चित्रपटात जान्हवी कपूरने चांगली भूमिका साकारली आहे. काही दृश्यांमध्ये तिची ओव्हरअॅक्टिंग झळकते, परंतु कॉमेडी असल्याने त्याकडे दुर्लक्ष करता येतं. दुसरीकडे सिद्धार्थ मल्होत्रा संपूर्ण चित्रपटात एकसारखाच दिसतो. त्याच्यापेक्षा चांगलं काम मनजोतने केलं आहे. संजय कपूर यांच्या भूमिकेला चित्रपटात फारसा वाव नाही, परंतु छोट्या भूमिकेतही त्यांनी दमदार अभिनय केलंय. इतर कलाकारांनीही ठीकठाक काम केलंय.
या चित्रपटाच्या कथेत दम नाही, त्यामुळे स्क्रीनप्लेसुद्धा फिका वाटू लागतो. याच कथेत जर आणखी काही मजेशीर एलिमेंट्स समाविष्ट केले असते, तर चित्रपट आणखी चांगला झाला असला. यातील संवादही काही विशेष नाहीत. सिद्धार्थ आणि जान्हवी यांची केमिस्ट्री चांगली आहे. यातील गाणीसुद्धा कमाल आहेत. त्यामुळे सीन कसाही असो, तेव्हा गाणं सुरू होतं, तेव्हा प्रेक्षक आपोआप खुश होतो. या गाण्यांमधील व्हिज्युअल्ससुद्धा सुंदर आहेत. सिद्धार्थ-जान्हवीची केमिस्ट्री, हलकी-फुलकी कॉमेडी आणि उत्तम गाणी यांच्या जोरावर हा चित्रपट एकदा पाहू शकता.
रेटिंग- तीन स्टार