तरुण दिसण्यासाठी सर्जरी, अनेकदा उपाशीच राहायची प्रसिद्ध हिरोइन; शेफालीच्या निधनानंतर अभिनेत्रीचा खुलासा

अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या निधनानंतर पायल घोषने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ब्युटी ट्रिटमेंट्सबद्दल चिंता व्यक्त केली. या मुलाखतीत तिने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या भेटीचा एक किस्सा सांगितला.

तरुण दिसण्यासाठी सर्जरी, अनेकदा उपाशीच राहायची प्रसिद्ध हिरोइन; शेफालीच्या निधनानंतर अभिनेत्रीचा खुलासा
शेफाली जरीवाला
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 02, 2025 | 9:14 AM

‘कांटा लगा’ या रिमिक्स गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री शेफाली जरीवालाचं 27 जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वयाच्या 42 व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला. शेफालीच्या मृत्यूचा तपास करताना पोलिसांना तिच्या घरात बरीच औषधं सापडली होती. ग्लुटाथियोन, अँटी एजिंगची ही औषधं होतं. त्यामुळे शेफालीच्या निधनानंतर इंडस्ट्रीतील कलाकार सौंदर्यासाठी काय-काय करतात, याबद्दलची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली आहे. यादरम्यान अभिनेत्री पायल घोषने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. पायलने सांगितलं की श्रीदेवी त्यांच्या वाढत्या वयामुळे खूप चिंतेत असायच्या.

श्रीदेवी यांच्यासोबत झालेल्या भेटीबद्दल बोलताना पायलने सांगितलं की, त्यांनी तरुण दिसण्यासाठी काही कॉस्मेटिक सर्जरी केल्या होत्या. “2017 मध्ये मी त्यांना ओशिवरा इथल्या एका क्लिनिकमध्ये भेटलो होते. त्यावेळी मी दोन मिनिटांपर्यंत त्यांच्याशी बोलली होती. मी नेहमीच त्यांच्या सौंदर्याची आणि स्टाइलची चाहती आहे. म्हणून मी त्यांना त्यांच्या सौंदर्याचं रहस्य विचारलं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, तरुण दिसावं यासाठी आणि वाढत्या वयाच्या भीतीपोटी त्यांनी कॉस्मेटिक सर्जरी केली होती. इतकंच नव्हे तर त्यांनी असंही सांगितलं की ठराविक वजन राखण्यासाठी आणि तंदुरुस्त दिसण्यासाठी त्या स्वत:ला अनेकदा उपाशी ठेवत होत्या. त्यांच्यासोबत झालेल्या या चर्चेनंतर माझी विचार करण्याची पद्धतच बदलली.”

याविषयी पायल पुढे म्हणाली, “श्रीदेवी यांच्यासोबतच्या त्या दोन मिनिटांच्या चर्चेचा माझ्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला. त्याच क्षणी मी माझे सर्व त्वचेचे उपचार थांबवण्याचा निर्णय घेतला. मला माझं आयुष्य असं जगायचं नव्हतं. आधी श्रीदेवींनी असं केलं होतं. आता शेफाली जरीवालाच्या बाबतीतही बोटॉक्स, फिलर्स आणि इतर उपचारांची चर्चा होत आहे. या सगळ्या गोष्टींमुळे कलाकार आपलं जीवन खूप लवकर गमावत आहेत. ही अत्यंत दु:खद आणि धक्कादायक बाब आहे. माझ्या मते आपल्या आयुष्यापेक्षा अधिक काहीच महत्त्वाचं नाही. मला खरंच असं वाटतं की कलाकारांनी यातून धडा घ्यावा आणि अशा उपचारांपासून, औषधांपासून दूर राहावं.”

ज्यादिवशी शेफालीचं निधन झालं, त्यादिवशी तिच्या घरी सत्यनारायण पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे ती दिवसभर उपाशी होती. त्यानंतर रात्री तिने फ्रिजमधून फ्राइड राइस खाल्ला. त्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागलं होतं.