पोलिसांची व्हॅन उभी असताना..; सलमानच्या घराबाहेरील गोळीबाराच्या घटनेवर अभिनेत्रीचा संताप

| Updated on: Apr 14, 2024 | 2:52 PM

सलमान खानच्या घराबाहेर रविवारी पहाटे अज्ञातांनी गोळीबार केला. या घटनेबाबत विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने गोळीबाराच्या या घटनेवर संताप व्यक्त केला. एक्सवर पोस्ट लिहित तिने पोलिसांना आवाहन केलं आहे.

पोलिसांची व्हॅन उभी असताना..; सलमानच्या घराबाहेरील गोळीबाराच्या घटनेवर अभिनेत्रीचा संताप
Salman Khan
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर रविवारी पहाटे अज्ञातांनी गोळीबार केला. या घटनेबाबत विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. अभिनेत्री पूजा भट्टने एक्सवर (ट्विटर) पोस्ट लिहित या घटनेबाबत संताप व्यक्त केला. त्याचप्रमाणे वांद्रे परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या दरोड्याच्या घटनेचा उल्लेख करत तिने पोलिसांना कडक तपासणीचं आवाहन केलंय. गोळीबाराची घटना ही अत्यंत भयानक आणि निषेधार्ह असल्याचं तिने म्हटलंय.

काय म्हणाली पूजा भट्ट?

‘हे अत्यंत भयानक आणि निषेधार्ह आहे. जर खान यांच्या निवासस्थानाबाहेर संरक्षणासाठी पोलिसांची व्हॅन उभी असताना ही घटना घडू शकते तर सुरक्षितता हा निव्वळ भ्रम असल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. वांद्रे परिसरात पोलिसांनी निश्चितच कडक पाळत ठेवणं गरजेचं आहे. काही दिवसांपूर्वी दरोड्याची घटना घडली आणि आता हा गोळीबार झाला. खरंच भितीदायक आहे’, असं तिने लिहिलंय. गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली आहे. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी पाचहून अधिक लोकांचा जबाब नोंदवला आहे.

हे सुद्धा वाचा

आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी सलमानच्या घराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज मिळवले आहेत. तर आरोपींना पकडण्यासाठी 15 पथके तयार करण्यात आली आहेत. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार झाला तेव्हा सलमान खान त्याच्या घरी उपस्थित होता. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून सलमानशी बातचित केली आहे.

दुसरीकडे या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. गृहमंत्री काय करत आहेत, असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. गोळीबाराच्या घटनेवर बोलताना राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. त्याबाबतची माहिती आम्हाला मिळेल. आम्हाला जेव्हा अधिक माहिती मिळेल, तेव्हा आम्ही देऊ. यात अटकळबाज्या करण्यात अर्थ नाही.”

सलमान खानला अनेकदा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली. यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. इतकंच नव्हे तर स्वत: सलमानने अत्यंत महागडी बुलेटप्रूफ गाडीदेखील खरेदी केली होती. सलमानसोबत आणि त्याच्या वांद्रे इथल्या घराबाहेर कडक सुरक्षाव्यवस्था असतानाही रविवारी पहाटे धक्कादायक घटना घडली.