प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं निधन; राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्याने खळबळ

छत्रपती संभाजीनगरचा प्रसिद्ध रीलस्टार अरुण तुपेच्या निधनाची बातमी समोर येत आहे. बालाजी नगर इथल्या राहत्या घरात तो मृतावस्थेत आढळला. त्याच्या निधनाच्या वृत्ताने नेटकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं निधन; राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्याने खळबळ
Arun Tupe
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 10, 2026 | 1:47 PM

प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं आज (मंगळवार, 10 मार्च) सकाळी निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या बालाजी नगर इथल्या राहत्या निवासस्थानी तो मृतावस्थेत आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ‘कोण अरुण तुपे’ या नावाने त्याचं इन्स्टाग्रामवर अकाऊंट असून त्यावर तो विविध रील्स पोस्ट करायचा. इन्स्टाग्रामवर त्याचे 179K फॉलोअर्स असून तरुणवर्गात तो खूप लोकप्रिय होता. आपल्या अभिनय कौशल्याने आणि कॉमेडीने त्याने नेटकऱ्यांची मनं जिंकली होती. त्यामुळे अरुणच्या निधनाच्या वृत्ताने सोशल मीडियावर हळहळ व्यक्त होत आहे.

अरुण त्याच्या राहत्या घरात अत्यवस्थेत आढळून आल्यानंतर नातेवाईकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर मृत घोषित केलं. अरुणचा मृतदेह घाटी इथल्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालात त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल, असं म्हटलं जात आहे.

इन्स्टाग्रामवर 21 तासांपूर्वीच अरुणने त्याचा शेवटचा रील पोस्ट केला होता. मृत्यूच्या काही तास आधीही तो त्या रीलवरील कमेंट्सना रिप्लाय देत होता. त्यामुळे त्याच्यासोबत असं काही घडेल, याची कल्पनाही कोणी नव्हती. त्याच्या या शेवटच्या रीलवर नेटकऱ्यांनी कमेंट करत शोक व्यक्त केला आहे. अरुणाल अपस्मारचा (फिट) त्रास होता, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. परंतु त्याच्या निधनामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. अरुण विविध विषयांवर इन्स्टाग्रामवर रील्स पोस्ट करायचा. त्याच्या रील्सला लाखोंनी व्ह्यूज, लाइक्स मिळायचे. सामाजिक आणि राजकीय विषयांवरही तो विनोदी रील्स पोस्ट करायचा, ज्याला नेटकऱ्यांकडून विशेष पसंती मिळायची.

याआधी मराठमोळा इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचंही अत्यंत कमी वयान निधन झालं होतं. जानेवारी महिन्यात त्याने अखेरचा श्वास घेतला होता. वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी त्याचं निधन झालं होतं. प्रथमेशसुद्धा प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, कंटेंट क्रिएटर, रील स्टार आणि डान्सर होता. प्रथमेशचे विनोदी इन्स्टाग्राम रील्स आणि युट्यूब व्हिडीओ नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय होते.

Follow Us