
Prajakta Mali : मराठी इंडस्ट्रीमधील सौंदर्य क्वीन आणि लाखो चाहत्यांची क्रश असणारी प्राजक्ता माळी चित्रपटांसोबतच तिच्या वेगवेगळ्या लुकमुळे आणि दागिन्यामुळे देखील सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. तिला ‘फुलवंती’ चित्रपटातून प्रचंड ओळख मिळाली. प्राजक्ताने 2025 चा शेवटचा दिवस अतिशय खास आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला. याची झलक तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली असून तिच्या या पोस्टला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे.
प्राजक्ता माळीने शेअर केलेल्या पहिल्या व्हिडीओमध्ये ती चुलीवर पारंपरिक पद्धतीने जेवण बनवताना दिसत आहे. ग्रामीण आणि घरगुती वातावरणात गरमागरम भाज्यांचं जेवण तयार करताना अभिनेत्रीचा साधेपणा आणि कुटुंबावरील प्रेम स्पष्टपणे दिसत आहे. या व्हिडीओला तिने, ‘Today’s Menu चुलीवरचं व्हेज जेवण…’ असं कॅप्शन दिलं आहे. कुटुंबीयांसोबत शांतपणे वेळ घालवत तिने नववर्षाचं स्वागत केलं.
याशिवाय, दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये प्राजक्ता माळी आपल्या कुटुंबीयांसोबत सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग असणाऱ्या अक्षय खन्नाच्या fa9la या अरेबिक गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये संपूर्ण कुटुंबाचा उत्साह आणि आनंद पाहायला मिळतो आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये प्राजक्ताने लिहिलं आहे, ‘आमची क्रेझी फॅमिली… आज 20 वर्षे झाली आम्ही नवीन वर्ष याच प्रकारे एकत्र साजरं करतो.’ या शब्दातून तिच्या कुटुंबातील जिव्हाळा आणि परंपरा स्पष्टपणे दिसून येतो.
इतकंच नाही तर आणखी एका व्हिडीओमध्ये प्राजक्ता कुटुंबीयांसोबत शेकोटी पेटवताना दिसत आहे. थंडीच्या वातावरणात शेकोटीभोवती बसून गप्पा, हास्य आणि आनंदी क्षणाचा आनंदर घेत प्राजक्ताने 2025 या वर्षाला निरोप दिला. कोणताही दिखावा न करता, साधेपणात आणि कुटुंबाच्या सहवासात वर्षाचा शेवट साजरा करण्याची तिची ही पद्धत अनेकांना भावली आहे.
‘देवखेळ’मध्ये दिसणार प्राजक्ता
प्राजक्ता माळीच्या या पोस्ट्सवर चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या असून अनेकांनी तिचं कौतुक देखील केलं आहे. दरम्यान, प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच Zee 5 वर प्रदर्शित होणाऱ्या ‘देवखेळ’ या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. या सीरिजमध्ये तिच्यासोबत सुपरस्टार अंकुश चौधरी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या सीरिजबाबत प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता असून लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.