“देवाच्या दारात कोणी सेलिब्रिटी नाही, दिशाभूल का करता?”; त्र्यंबकेश्वर येथे नृत्य करण्यास मनाई करणाऱ्यांना प्राजक्ता माळीचं थेट उत्तर

त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त प्राजक्ता माळीच्या शास्त्रीय नृत्याला विरोध करण्यात आला होता. दरम्यान प्राजक्ता माळीने व्हिडिओद्वारे या वादावर थेट उत्तर दिलं आहे. तिने व्हडीओ शेअर करत तिने या सगळ्याच गोष्टींवर स्पष्टीकरण दिलं आहे.

देवाच्या दारात कोणी सेलिब्रिटी नाही, दिशाभूल का करता?; त्र्यंबकेश्वर येथे नृत्य करण्यास मनाई करणाऱ्यांना प्राजक्ता माळीचं थेट उत्तर
| Updated on: Feb 25, 2025 | 4:58 PM

महाशिवरात्रीला नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये मंदिर विश्वस्तांच्या वतीने कार्यक्रमात अभिनेत्री प्राजक्ता माळी ही शास्त्रीय नृत्य करणार होती. मात्र तिच्या या ‘शिवस्तुती नृत्याविष्कार’द्वारे तिची कला सादर करण्यासाठी खास आमंत्रण मिळालं आहे. विरोध करण्यात आला होता.याबाबत माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी यासंदर्भात ग्रामीण पोलिसांना पत्र पाठवलं आहे. कार्यक्रमामुळे मंदिरातील धार्मिक वातावरण बिघडू नये, असं ललिता यांनी म्हटलं होतं. याबाबत चांगलीच चर्चा रंगली. मात्र आता यावर प्राजक्ता माळीने व्हिडिओ शेअर करत थेट उत्तर दिलं आहे.

त्र्यंबकेश्वर वादावार प्राजक्ता माळीचे व्हिडीओद्वारे स्पष्टिकरण 

प्राजक्ता माळीने तिचा एक व्हिडीओ शेअर करत या वादावर तिचं मत मांडलं आहे. तिने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की, “यंदाच्या महाशिवरात्रीला काय करावं असा विचार मनात घोळत असतानाच मला त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टकडून फोन आला. त्यांनी सांगितलं की,’दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त मंदिराच्या प्रांगणामध्ये शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीतावर, नृत्यावर आधारित उत्सव आयोजित करत असतो. आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकार इथे येऊन आपली कला सादर करुन गेले आहेत. फुलवंतीच्या निमित्ताने आम्हाला कळलं की तुम्ही सुद्धा भरतनाट्यम नर्तिका आहात. तर यंदाच्या वर्षी तुम्ही तुमच्या शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम सादर कराल का?’ अर्थातच सगळ्या नृत्यकर्मींसाठी नटराज ही नृत्यदेवता आहे, आराध्य दैवत आहे. त्यामुळे मी वेळ न दवडता त्यांना तात्काळ होकार कळवला. ” असं म्हणतं तिने या कार्यक्रमासाठी तिला का आमंत्रित केलं गेलं होतं त्याबद्दल स्पष्ट केलं आहे.

वादावर काय म्हणाली प्राजक्ता

दरम्यान तिच्या नृत्यावरून विरोध झालेल्या कारणांवर तिने स्पष्ट मत मांडलं आहे. ती म्हणाली की, “मी इथे आवर्जुन नमूद करु इच्छिते की महाशिवरात्रीनिमित्त होणारा हा कार्यक्रम संपूर्णत: शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीतावर आधारित असलेल्या नृत्याचा कार्यक्रम आहे. ज्यांना माहित नसेल त्यांना मी सांगू इच्छिते की मी स्वत: भरतनाट्यम नर्तिका आहे. मी विशारद, अलंकार केलेलं आहे. त्यातच बीए, एमए केलं आहे. तर अपुऱ्या माहितीमुळे जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर त्यांनी त्यांच्या मनातील किंतू परंतू काढून टाकावं. समाजाची दिशाभूल करु नये अशी मी त्यांना विनंती करते.” असं म्हणत तिने ललिता शिंदे यांचं नाव न घेता त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिलं आहे.

“देवाच्या दारात कोणी सेलिब्रिटी नसतो”

तसेच ती पुढे म्हणाली,”एक गोष्ट आवर्जुन सांगायची की देवाच्या दारात कोणी सेलिब्रिटी नसतो. सगळे भक्त असतात. त्याच भक्तीभावाने मी माझ्या नृत्याच्या माध्यमातून माझी सेवा नटराजाच्या चरणी रुजू करणार आहे. अर्पण करणार आहे. म्हणूनच कार्यक्रमाचं नाव शिवार्पणमस्तु असं आहे. अर्थातच वेळेच्या कारणामुळे मी दोनच रचना सादर करणार आहे. बाकी रचना माझे सहकलाकार सादर करतील. मी निवेदन करणार आहे. चेंगराचेंगरी, गर्दीची भीती असेल तर विश्वस्त, पोलिस जो निर्णय घेतील तो सामाजिक भान बाळगत सर्वांवर बंधनकारक असणार आहे. तो सगळ्यांनाच मान्य असणार आहे. हर हर महादेव.” असं म्हणत तिने तिच्या नृत्य कार्यक्रमाला नाकारण्यात आलेल्या कारणांवरून स्पष्टिकरण दिलं आहे.

प्राजक्ताचा नृत्य कार्यक्रम होणार, त्र्यंबकेश्वर विश्वस्त मनोज थेट 

दरम्यान प्राजक्ताच्या या व्हिडीओनतंर आता त्र्यंबकेश्वर विश्वस्त मनोज थेट यांच्याकडूनही या वादावर आता स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. तसेच प्राजक्ता माळीचा त्र्यंबकेश्वरमधील कार्यक्रम होणार असून ती भरतनाट्यम आणि कथ्थक करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच मनोज यांनी पुढे म्हटलं आहे की, दरवर्षी प्रमाणे अशा कार्यक्रमाचे यंदाही आयोजन करण्यात आलं आहे. पुरातत्व विभागाकडूनच तशी परवानगी मिळाल्याचं मनोज यांनी म्हटलं आहे.