डर गया.. ‘सिंघम’च्या जयकांत शिक्रेनं पंतप्रधान मोदींची उडवली खिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री उशिरा पोस्ट केलेल्या सेल्फी व्हिडीओवर अभिनेते प्रकाश राज यांनी ट्विट करत त्यांची खिल्ली उडवली आहे. प्रकाश राज हे वारंवार मोदींवर टीका करत असून त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

डर गया.. सिंघमच्या जयकांत शिक्रेनं पंतप्रधान मोदींची उडवली खिल्ली
Prakash Raj and Narendra Modi
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 25, 2026 | 8:30 AM

नीट पेपरफुटीप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली देशभरात विद्यार्थ्यांचं आणि तरुणांचं आंदोलन तीव्र होत असल्याचं पाहत अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मध्यरात्री एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी स्पष्ट केलं की, नीट पेपरफुटी प्रकरणात त्यांनी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत आणि दोषींवर कठोर शिक्षेसाठी एक विधेयक संसदेत मंजूर केलं जाईल. शुक्रवारी दिवसभर सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये या व्हिडीओची चर्चा होती. कारण मोदींचा हा व्हिडीओ नेहमीपेक्षा खूप वेगळा होता. यावरून आता प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. मोदींचा व्हिडीओ शेअर करत प्रकाश राज यांनी लिहिलं, ‘डर गया’ (घाबरले). मोदींच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत असल्याचं म्हणत त्यांनी निशाणा साधला. मात्र त्यानंतर मोदी समर्थकांनी त्यांना ट्रोल केलं.

गुरुवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 मिनिट 55 सेकंदांचा एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्याची सुरुवात त्यांनी ‘हॅलो फ्रेंड्स’ म्हणत केली होती. कॅबिनेटच्या बैठकीत फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेचा प्रस्ताव मांडणार, असं त्यांनी व्हिडीओत स्पष्ट केलं होतं. प्रकाश राज यांनी हाच व्हिडीओ त्यांच्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आणि लिहिलं, ‘घाबरले.. मला त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती दिसत आहे. माझ्या देशातील तरुणांचे मी आभार मानतो. कॉकरोच.. यासाठी तुमचे आभार. खूप खूप धन्यवाद.’

प्रकाश राज यांची पोस्ट-

प्रकाश राज नेहमीच विविध मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरताना दिसतात. मोदींविरोधात पोस्ट लिहिण्याची त्यांची ही काही पहिलीच वेळ नाही. आता थेट मोदींना ‘घाबरले’ असं म्हटल्याने भाजप आणि मोदी समर्थकांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. ‘तुम्ही गेल्या बारा वर्षांपासून आम्हाला घाबरवत आहात, तुम्ही पुढली बारा वर्षेसुद्धा असंच घाबरवत राहा. देव तुम्हाला शक्ती देवो आणि तुम्हाला चित्रपटात अजिबात काम न मिळो’, असं एकाने लिहिलं. तर ‘फुटक्या कवडीच्या व्हिलेनने ते घाबरतील का? खरंच असं वाटतं का तुम्हाला’, असा खोचक सवाल दुसऱ्याने केला. ‘ते घाबरवण्यावर आले तर रडू नका’, असंही नेटकऱ्यांनी प्रकाश राज यांना सुनावलंय.

प्रकाश राज हे दिल्लीतल्या जंतरमंतर इथं सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनातसुद्धा सहभागी झाले होते. संसदेवर काढलेल्या धडक मोर्चात ते आघाडीवर होते. सोनम वांगचूक यांना तिथून थेट रुग्णालयात दाखल केल्याच्या कारवाईमुळेही ते संतप्त झाले होते. या कृतीला त्यांनी ‘मोदींची हुकूमशाही’ असं म्हटलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us