प्रकाश राज यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

अभिनेते प्रकाश राज यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांच्या आईने या जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि दाक्षिणात्य अभिनेते पवन कल्याण यांनी पोस्ट लिहित श्रद्धांजली अर्पण केली आहे.

प्रकाश राज यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
Prakash Raj
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 31, 2026 | 9:24 AM

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 30 मार्च रोजी त्यांची आई सुवर्णलता यांचं निधन झालं आहे. त्या 86 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून सुवर्णलता या आरोग्याच्या विविध समस्यांशी झुंज देत होत्या. काल सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. प्रकाश राज यांची आई बेंगळुरूमध्ये राहत होत्या. राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज (मंगळवार, 31 मार्च 2026) बेंगळुरूमध्येच अंत्यसंस्कार करण्यात येतील.

प्रकाश राज हे त्यांच्या आईच्या प्रकृतीविषयी काही मुलाखतींमध्ये मोकळेपणे व्यक्त झाले होते. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की आईच्या डोक्यात सिस्ट (cyst) होते, ज्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. सर्जरीनंतर त्यांना स्मरणाशी संबंधित गंभीर समस्या निर्माण झाली. त्या जवळच्या लोकांनाही ओळखू शकत नव्हत्या. 2018 मध्ये एका कार्यक्रमादरम्यान प्रकाश राज यांनी सांगितलं होतं की, सर्जरीच्या काही दिवसांनंतरच त्यांची आई आपल्या बहिणीला आणि मुलालाही विसरल्या होत्या. हा काळ त्यांच्यासाठी अत्यंत कठीण आणि भावूक होता. आईची स्मरणशक्ती पुन्हा मिळवण्यासाठी त्यांनी त्यांच्या जुन्या मित्रमैत्रिणींची मदत घेतली होती.

पवन कल्याण यांची पोस्ट-

सुवर्णलता यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित शोक व्यक्त केला आहे. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांनीसुद्धा एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘प्रकाश राज यांच्या आई सुवर्णलता यांच्या निधनाचं वृत्त ऐकून अतीव दु:ख झालं. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि प्रकाश राज यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाप्रती मी संवेदना व्यक्त करतो’, असं त्यांनी लिहिलं आहे.

अभिनेते प्रकाश राज हे दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्येही सक्रिय आहेत. नुकतेच ते ‘तेरे इश्क में’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. यामध्ये त्यांनी धनुषच्या ऑनस्क्रीन वडिलांची भूमिका साकारली होती. ‘सिंघम’ चित्रपटात त्यांनी साकारलेली जयकांत शिक्रेची खलनायकी भूमिका विशेष गाजली होती. याशिवाय ते लवकरच ‘जन नायकन’ या तमिळ चित्रपटात दिसणार आहेत. तमिळ अभिनेता थलपती विजयच्या करिअरमधील हा शेवटचा चित्रपट असल्याचं म्हटलं जात आहे.

Follow Us