Pushpa 2 मध्ये फहाद फासिलची जागा अर्जुन कपूर घेणार? निर्मात्यांची प्रतिक्रिया आली समोर

| Updated on: Oct 09, 2022 | 5:04 PM

'पुष्पा'च्या सीक्वेलमध्ये अर्जुन कपूरची एण्ट्री? काय आहे सत्य?

Pushpa 2 मध्ये फहाद फासिलची जागा अर्जुन कपूर घेणार? निर्मात्यांची प्रतिक्रिया आली समोर
Arjun Kapoor and Allu Arjun
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई- स्टायलिश स्टार म्हणून ओळखला जाणाऱ्या अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राईज’ (Pushpa) हा चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झाला. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिलच्या (Fahadh Faasil) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या सीक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘पुष्पा: द रूल’ या सीक्वेलवर निर्माता-दिग्दर्शकांनी काम सुरू केलं आहे. या महिन्याच्या अखेरीस रश्मिका आणि अल्लू अर्जुन शूटिंगला सुरुवातदेखील करणार आहेत. मात्र आता सीक्वेलमध्ये बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची (Arjun Kapoor) एण्ट्री होणार असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

‘पुष्पा 2’मध्ये फहाद फासलची जागा अर्जुन कपूर घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे. पुष्पामध्ये फहादने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. त्याच्या दमदार अभिनयकौशल्याचं प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक झालं होतं. आता पुष्पाचे निर्माते नवीन यर्नेनी यांनी या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

हे सुद्धा वाचा

‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “फहाद फासिलच ती भूमिका साकारणार आहे. त्यामुळे या सर्व चर्चा 100% खोट्या आहेत. आम्ही या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 20 ते 30 ऑक्टोबरदरम्यान शूटिंगला सुरुवात करणार आहोत. हैदराबाद आणि इतर जंगल परिसरात या चित्रपटाची शूटिंग होणार आहे.”

पुष्पाच्या पहिल्या भागाचं दिग्दर्शन सुकुमारने केलं होतं. सीक्वेलचंही दिग्दर्शन तोच करणार आहे. पहिल्या भागाच्या प्रचंड यशानंतर आता सीक्वेलसाठी बजेट वाढवल्याचंही समजतंय. ‘पुष्पा 2’ हा चित्रपट तब्बल 450 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनणार असल्याचं कळतंय. हा चित्रपट मूळ तेलुगू भाषेत असून संपूर्ण भारतात तो तेलुगूसोबतच हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेतही प्रदर्शित होणार.