प्रसिद्ध गायकाच्या घरावर गोळीबार; लॉरेन्स बिष्णोई गँगने स्विकारली जबाबदारी

प्रसिद्ध पंजाबी गायकाच्या घरावर गोळीबार झाला असून लॉरेन्स बिष्णोई गँगकडून या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित या गोळीबारामागचं कारणसुद्धा सांगितलं आहे.

प्रसिद्ध गायकाच्या घरावर गोळीबार; लॉरेन्स बिष्णोई गँगने स्विकारली जबाबदारी
लॉरेन्स बिष्णोई
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 29, 2025 | 9:57 AM

प्रसिद्ध पंजाबी गायक चन्नी नट्टनच्या कॅनडामधील घरावर गोळीबार करण्यात आला. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या गँगने या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित या गोळीबाराचं कारण गँगकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. गायक सरदार खेरासोबतच्या जवळच्या संबंधांमुळे चन्नीच्या घरावर गोळीबार केल्याचं या पोस्टमध्ये म्हटलंय. बिष्णोईचा सहकारी गोल्डी ढिल्लनने हा दावा केला आहे. त्याचसोबत त्याने गोळीबाराचा व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे. ‘सत श्री अकाल! मी गोल्डी ढिल्लन (लॉरेन्स बिष्णोई गँगचा) आहे. काल गायक चन्नी नट्टनच्या घरावर झालेल्या गोळीबाराचं कारण सरदार खेरा आहे’, असं या पोस्टमध्ये लिहिलंय.

म्युझिक इंडस्ट्रीला धमकी देत त्यात पुढे म्हटलंय, ‘भविष्यात जर कोणी सरदार खेरासोबत काम करत असेल किंवा त्याच्याशी कोणताही संबंध ठेवत असेल तर ती व्यक्ती स्वत:च्या नुकसानासाठी पूर्णपणे जबाबदार असेल. कारण आम्ही सरदार खेराचं नुकसान करतच राहू. हा हल्ला चन्नी नट्टनवर नव्हता. आमचे त्याच्याशी कोणतेही वैयक्तिक वैर नाहीत.’ दरम्यान कॅनडातील स्थानिक पोलीस या घटनेची आणि बिष्णोई गँगच्या दाव्याची सत्यता तपासत आहेत.

गँगस्टर रोहित गोदाराशी संबंधित तीन जणांनी काही दिवसांपूर्वीच कॅनडामध्ये प्रसिद्ध पंजाबी गायक तेजी काहलोंवर गोळीबार केल्याची कबुली दिली होती. ही तर फक्त सुरुवात आहे, असा थेट इशारा त्यांनी गोळीबारानंतर दिला होता. रोहित गोदारा हा राजस्थानमधील कुख्यात गँगस्टर आहे.

फेसबुकवर महेंद्र सरन दिलाना, राहुल रिनाऊ आणि विकी फलवान यांनी गोळीबारात तेजी जखमी झाल्याचा दावा केला होता. ‘कॅनडामध्ये आम्ही तेजी काहलोंवर गोळीबार केला आहे. त्याच्या पोटात गोळी लागली आहे. यातून त्याला समजलं तर ठीक, अन्यथा पुढच्या वेळेस आम्ही थेट त्याला संपवू’, अशी धमकी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे देण्यात आली होती. या पोस्टमध्ये रोहित गोदाराच्या गँगने इतरही काही बिझनेसमन, बिल्डर्स आणि आर्थिक मध्यस्थांसह इतरांनाही शत्रू गँगला मदत करण्यापासून इशारा दिला होता. शत्रू गँगची मदत करणाऱ्यांनाही अशीच शिक्षा भोगावी लागेल, असं त्यात लिहिलं होतं.