ट्रोलिंगनंतर आर. माधवनला जाग; सरकारच्या चुकांबद्दल बोलला तरी नेटकऱ्यांनी झापलं..

'धुरंधर' फेम अभिनेता आर. माधवनने अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पोस्ट लिहिली आहे. मात्र या पोस्टवरूनही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. इतक्या उशिरा ही पोस्ट का लिहिली, असा सवाल काहींनी केला आहे.

ट्रोलिंगनंतर आर. माधवनला जाग; सरकारच्या चुकांबद्दल बोलला तरी नेटकऱ्यांनी झापलं..
आर. माधवन, सीजेपी आंदोलन
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 23, 2026 | 4:02 PM

नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशभरातील विद्यार्थी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. या आंदोलनावर बॉलिवूडच्या विविध सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही जण अजूनही मौन बाळगून आहेत. याच गोष्टीमुळे एफटीआयआयचे अध्यक्ष आणि अभिनेता आर. माधवनला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. एफटीआयआयच्या त्याच्या केबिनबाहेर ‘गायब’, ‘नीट पेपर विक्रीसाठी’ असं पोस्टर लावण्यात आलं होतं. या ट्रोलिंगनंतर अखेर माधवनने इन्स्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट लिहित विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं समर्थन केलं आहे. मात्र त्याच्या या पोस्टनेही नेटकरी समाधानी झाले नसून त्यांनी कमेंटमध्ये टीकेची झोडच उठवली आहे.

माधवनची पोस्ट-

आर. माधवनने लिहिलं, ‘शिक्षण आपल्या राष्ट्राचं भविष्य घडवतं. प्रत्येक विद्यार्थ्याला निष्पक्ष आणि प्रामाणिकपणावर आधारित शिक्षण प्रणाली मिळण्याचा हक्क आहे. भारतातील तरुणांवर माझा नेहमीच विश्वास राहिला आहे. आज विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना वाटणारी भीती, चिंता आणि निराशा मी पूर्णपणे समजू शकतो. परीक्षेचं वातावरण हे मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारं असायला हवं. पण जेव्हा पेपरफुटीच्या घटना घडतात, तेव्हा लाखो मुलांची आणि त्यांच्या कुटुंबाची मेहनत, आशा आणि स्वप्नं उद्ध्वस्त होतात. विशेषत: आपल्या देशात, जिथे शिक्षण हे उत्तम जीवनाचं अंतिम साधन आहे.’

‘या गोंधळाला जबाबदार असलेल्यांना सरकारने शक्य तितकी कठोर शिक्षा त्वरित द्यावी, असं मी सरकारला आवाहन करतो. आपल्या मुलांचं भविष्य धोक्यात घालण्याचं धाडस कोणीही करणार नाही, अशी शिक्षा दोषींना द्यावी. भूतकाळातील चुका मान्य करून सरकार या व्यवस्थेत सुधारणा करेल आणि शिक्षण, परीक्षांची पवित्रता जपण्यासाठी कठोर उपाययोजना करेल, अशी मला खात्री आहे. आज जे तरुण व्यथित किंवा निराश आहेत, त्यांना मी हात जोडून विनंती करतो की कृपया धैर्य आणि आत्मविश्वास गमावू नका. तुमची क्षमता आणि कठोर परिश्रम या व्यवस्थेतील उणिवांपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. तुम्ही कठोर परिश्रम करत राहा, स्वत:वर विश्वास ठेवा’, असं त्याने पुढे लिहिलं आहे.

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्देशून तो म्हणाला, “जे शांततेनं आवाज उठवत आहेत आणि बदलाची मागणी करत आहेत, त्या सर्वांच्या ध्येयाचं मी कौतुक करतो. पण त्याचवेळी मी तुम्हाला आवाहन करू इच्छितो की, जे स्वार्थी लोक या महत्त्वाच्या मुद्द्याचा गैरफायदा घेण्याचा किंवा त्यावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यांच्यापासून सावध राहा. प्रत्येक नागरिकाला शांततेनं आपली मतं व्यक्त करण्याचा अधिकार आहे. ज्यांच्यावर देशाची जबाबदारी आहे, त्यांचा मी नेहमीच आदर केला आहे. कारण फक्त एकत्र येऊनच आपण एक मजबूत आणि उत्तम भारत घडवू शकतो.”

माधवनने ही भलीमोठी पोस्ट लिहिल्यानंतरही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. ‘खरंच.. किती सुरक्षितपणे तू खेळतोय. मी तुला माझा आदर्श मानत होतो, यावर मला विश्वास बसत नाहीये’, असं एकाने लिहिलं. तर ‘खरंच का? इतकं सर्व घडल्यानंतर आता पोस्ट लिहितोय’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘तुला खूपच उशिरा हे सुचलंय’, असं म्हणत नेटकऱ्यांनी टीका केली आहे.

Follow Us