सीनच इतका गंभीर की ‘पंचायत’ फेम अभिनेत्याला आला हार्ट अटॅक; शूटिंगच्या एक दिवस आधी बिघडली तब्येत
'पंचायत' या लोकप्रिय वेब सीरिजमध्ये भूमिका साकारलेले अभिनेते रघुबीर यादव हे सध्या 'हुंकार' या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या सीरिजमधील त्यांची भूमिका नकारात्मक असून त्याचा त्यांच्या आरोग्यावर खूप परिणाम झाला.

‘पंचायत’ या गाजलेल्या वेब सीरिजमधील प्रसिद्ध अभिनेते रघुबीर यादव हे सध्या ‘हुंकार: द रोअर’ या सीरिजमुळे चर्चेत आले आहेत. या सीरिजचे दिग्दर्शक करण कपाडिया आणि खुद्द रघुबीर यादव यांनी पडद्यामागील सीन्सच्या चर्चेदरम्यान एक धक्कादायक किस्सा सांगितला. या सीरिजमध्ये रघुबीर हे धर्मगुरूच्या भूमिकेत असून त्यांची नकारात्मक छटा दाखवण्यात आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी खुलासा केला की, त्यांना ज्यादिवशी कोर्टरुमचा इंटेन्स सीन शूट करायचा होता, त्याच्या आदल्या रात्री हृदयविकाराचा झटका आला होता. नकारात्मक भूमिकेचा त्यांच्या आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम झाला होता आणि त्यामुळे तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं.
‘हुंकार’चे दिग्दर्शक करण कपाडिया यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान रघुबीर यादव यांनी सीरिजमध्ये बापजी हे पात्र साकारण्याबद्दल चर्चा केली. या सीरिजमध्ये बापजींची घृणास्पद कृत्ये दाखवण्यात आली आहेत. हे नकारात्मक आणि आव्हानात्मक पात्र साकारणं मानसिकदृष्ट्या खूप थकवणारं होतं आणि त्याचा त्यांच्या आरोग्यावरही परिणाम झाला, असं त्यांनी स्पष्ट केलं. “अभिनयातील सर्वांत प्रभावी क्षण हे अनेकदा आतून येतात, ते अभिनेत्याने जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या गोष्टींमधून येत नाहीत”, असंही ते म्हणाले. रघुबीर हे खऱ्या आयुष्यात अत्यंत संवेदनशील आहेत. त्यामुळे या तीव्र दृश्याच्या शूटिंगदरम्यान ते खूप अस्वस्थ झाले.
सीनबद्दल सांगताना रघुबीर गंमतीनं म्हणाले की, ते दृश्य इतकं इंटेन्स होतं की त्यांना हार्ट अटॅक आल्याचाही एकप्रकारे आनंद झाला. नकारात्मक भूमिका साकारण्याच्या मानसिक दबावामुळे हळूहळू त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आणि शूटिंगदरम्यान त्यांची प्रकृती इतकी खालावली की त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. याविषयी ते पुढे म्हणाले, “यादरम्यान मी 50 वेळा तरी मेलो असेन. मी तुम्हाला खरंच सांगतोय. पडद्यामागे काय चाललंय हे ऐकणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. फक्त कठीणच नाही तर माझ्या डोळ्यांसमोर जणू अंधारच पसरला होता. त्या हार्ट अटॅकच्या वेळी मला खरंतर एक विचित्र प्रकारचा आनंद जाणवत होता.”
रघुबीर यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच पुन्हा लगेचच कामाला सुरुवात केली. “त्या सीनसाठी मी कोणताही जाणीवपूर्वक प्रयत्न केला नाही. शब्द आणि भावना आतूनच आल्या होत्या. माझ्या पात्राच्या परिस्थितीनुसार ते आकारत गेलं. सर्वकाही नैसर्गिकरित्या आलं. मी बळजबरीने आणण्याचा काहीच प्रयत्न केला नाही”, असं त्यांनी पुढे स्पष्ट केलं. ‘हुंकार’ ही सीरिज एक कोर्टरुम ड्रामा आणि क्राइम थ्रिलर आहे. यामध्ये ‘सैय्यारा’ फेम अभिनेत्री अनीत पड्डाने 17 वर्षांच्या मुलीची भूमिका साकारली आहे.