
अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘रेड 2’ हा चित्रपट 1 मे 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवरील दमदार कमाईनंतर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट थिएटरमधून बाहेर पडला असून आता कोणत्या प्लॅटफॉर्मवर तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. याबद्दलची माहिती नुकतीच समोर आली आहे. अजय देवगणचा ‘रेड 2’ हा चित्रपट त्याच्याच ‘रेड’ या चित्रपटाचा सीक्वेल आहे. 2018 मध्ये पहिला भाग प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये अजयसोबत अभिनेत्री इलियाना डिक्रूझ झळकली होती. आता सीक्वेलमध्ये अजयसोबत रितेश देशमुख आणि वाणी कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 225.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. या वर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘रेड 2’ने स्थान मिळवलंय.
एखादा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्याच्या जवळपास चार आठवड्यानंतर तो ओटीटीवर स्ट्रीम केला जातो. परंतु जर एखादा चित्रपट थिएटरमध्ये खूप चांगली कामगिरी करत असेल, तर ओटीटी स्ट्रिमिंगची तारीख पुढेही ढकलली जाऊ शकते. थिएटरमधील कमाईसाठी पुरेसा वेळ दिल्यानंतरच तो ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आणला जातो.
‘रेड 2’ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. येत्या 26 जून रोजी अजय देवगणचा हा चित्रपट ओटीटीवर स्ट्रीम होणार आहे. म्हणजेच तुम्ही आता हा चित्रपट घरीबसल्या आरामात पाहू शकता. नेटफ्लिक्सने या चित्रपटाचा पोस्टर शेअर करत स्ट्रीमिंगची तारीख जाहीर केली आहे. ‘आज से उल्टी गिनती शुरू.. अमय पटनायक एका नवीन केस आणि त्याच जुन्या जोशाने परत येतोय’, असं कॅप्शन लिहित नेटफ्लिक्सने स्ट्रीमिंगच्या तारखेबद्दलची माहिती दिली आहे.
‘मैदान’, ‘औरों में कहां दम था’, ‘सिंघम अगेन’, ‘नाम’ आणि ‘आझाद’ यांसारखे चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर अजयने ‘रेड 2’च्या निमित्ताने षटकार मारल्याचं म्हटलं गेलं. एका प्रामाणिक अधिकाऱ्याचा सामना जेव्हा भ्रष्ट राजकारण्याशी होतो, तेव्हा काय घडतं याची कथा या चित्रपटात पहायला मिळते. यामध्ये यशपाल शर्मा, अमित सियाल आणि बृजेंद्र काला यांनीसुद्धा विशेष छाप सोडली आहे. चित्रपटात रितेशच्या आईची भूमिका साकारणाऱ्या सुप्रिया पाठक आणि अजयच्या बॉसच्या भूमिकेतील रजत कपूर यांनीही उल्लेखनीय काम केलं.