
गेल्या काही दिवसांपासून महेश मांजरेकर लिखित, दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळाली. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजरे लावली. दरम्यान, राज ठाकरे यांनी ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा सिनेमा का पाहावा यामागचं कारण सांगितलं आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे यांनी या कार्यक्रमात बोलताना महेश मांजरेकर हा झपाटलेला आहे असे देखील म्हटले. ‘एक काठियावाडी माणूस शिवाजी महाराजांवर चित्रपट काढतो याचं नवल आहे. महेश मांजरेकर याच्यावर महेश कोठारे यांने झपाटलेला २ काढावा , इतका महेश मांजरेकर हा झपाटलेला आहे. शिवाजी राजे भोसले बोलतोय हा पहिला चित्रपट मुंबई, ठाणे, नाशिकसाठी होता. हा चित्रपट (‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’) राज्याच्या ग्रामिण भागासाठी आहे. शेतकरी यांच्या आत्महत्येबाबत मांडलेला हा विषय धाडसातून येतो. हिंदी चित्रपटसृष्टीतील यश चोप्रा तसे मराठीतील महेश मांजरेकर. शिवाजी महाराजांच्या भूमिकेवर बरेच चित्रपट आले. पण हा भूतकाळ आणि वर्तमानातील विषय आहे’ असे राज ठाकरे यांनी म्हटले.
वाचा: हिचे क्लिवेज बघ किती डिप; गायिकेने सांगितला पुण्यातल्या बालरोगतज्ज्ञासोबतचा वाईट अनुभव
काही दिवसांपूर्वी ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटातील महेश मांजरेकर यांचा लूक चर्चेत होता. या चित्रपटातील ‘दुर्गे दुर्गट भारी’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. या गाण्यातील महेश मांजरेकर यांच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले होते. डोक्यावर भगवा कपडा, गळाभोवती रुद्राक्षांच्या माळा, विस्कटलेले केस, लांब दाढी आणि हातात शंख असा महेश मांजरेकर यांचा साधू रूपातील अतिशय वेगळा लूक पाहायला मिळाला होता.
कधी प्रदर्शित होणार सिनेमा?
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट येत्या ३१ ॲाक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध या चित्रपटाचे निर्माते असून यात सिद्धार्थ बोडके, विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, नित्यश्री यांच्या प्रमुख भूमिका आहेत.