Raja Shivaji : 11 व्या दिवशीही ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची दमदार कमाई; रचले ‘हे’ 4 विक्रम

Raja Shivaji Box Office Collection : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड कायम आहे. गेल्या अकरा दिवसांत या चित्रपटाने किती कमाई केली, ते जाणून घ्या..

Raja Shivaji : 11 व्या दिवशीही राजा शिवाजी चित्रपटाची दमदार कमाई; रचले हे 4 विक्रम
Raja Shivaji
Image Credit source: Instagram
| Updated on: May 12, 2026 | 8:53 AM

रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातही कमाईची उत्कृष्ट गती कायम ठेवली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 70.65 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली आहे. विक्रमी ओपनिंगसह इतिहास रचल्यानंतर आणि पहिल्या आठवड्यात आपली पकड कायम ठेवल्यानंतर, या ऐतिहासिक चित्रपटाच्या कमाईत शनिवार आणि रविवारी जोरदार वाढ दिसून आली. ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘राजा शिवाजी’ने प्रदर्शनाच्या अकराव्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या सोमवारी 2.40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाचा एकूण बजेट 75 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत बजेटचा हा आकडा वसूल होण्याची शक्यता आहे.

‘राजा शिवाजी’ चित्रपटाची भारतातील आतापर्यंतची कमाई-

  • पहिला आठवडा- 57.70 कोटी रुपये
  • आठवा दिवस (शुक्रवार)- 3.50 कोटी रुपये
  • नववा दिवस (शनिवार)- 6.30 कोटी रुपये
  • दहावा दिवस (रविवार)- 7.60 कोटी रुपये
  • अकरावा दिवस (सोमवार)- 2.40 कोटी रुपये
  • एकूण- 70.65 कोटी रुपये

‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे विक्रम-

  • मराठी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट
  • मराठी चित्रपटसृष्टीत ओपनिंग वीकेंडला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
  • मराठी चित्रपटासाठी सर्वाधिक एका दिवसाची कमाई
  • मराठी चित्रपटासाठी पहिल्या आठवड्यातील सर्वाधिक कमाई

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत रितेश या चित्रपटाच्या बजेटबद्दल म्हणाला, “बजेटबद्दलचे खरे आकडे हे फक्त निर्मात्यांनाच माहीत आहेत. आपण चित्रपटाच्या बजेटवर चर्चा करण्याची अजिबात गरज नाही, कारण त्याचा कशावरही परिणाम होत नाही. बजेट इतकं महत्त्वाचं का आहे? जर मला कोणी विचारलं, तर मी त्यांना उलट विचारतो की, तुम्ही चित्रपट पाहण्यासाठी तिकिटाचे किती पैसे देत आहात? जेव्हा ते म्हणतात की 100 रुपये, 250 किंवा 300 रुपये.. तेव्हा मी त्यांना उत्तर देतो की, तेच बजेट आहे. आपण याबद्दल बोलणं थांबवलं पाहिजे. जेव्हा मी अमिताभ बच्चन यांचा शोलेसारखा चित्रपट पहायला जायतो, तेव्हा मी कधीच विचार केला नाही की, या चित्रपटाचं बजेट किती असेल? मला फक्त मोठ्या पडद्यावर मनोरंजनाचा आनंद घ्यायचा होता. चित्रपटांनी किती कमाई केली हे आम्हाला कधीच माहीत नसायचं. दुर्दैवाने आजकाल हाच खेळ चालला आहे.”

Follow Us