Raja Shivaji FIRST Review: रितेश देशमुखच्या करिअरमधील सर्वोत्तम कामगिरी, जाणून घ्या कसा आहे सिनेमा

अभिनेता रितेश देशमुखचा राजा शिवाजी हा सिनेमा सतत चर्चेत आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात होते. आज अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर त्याचा पहिला रिव्ह्यू समोर आला आहे.

Raja Shivaji FIRST Review: रितेश देशमुखच्या करिअरमधील सर्वोत्तम कामगिरी, जाणून घ्या कसा आहे सिनेमा
Raja Shivaji
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 01, 2026 | 11:40 AM

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळाली. आज 1 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अनेकजण चित्रपट कसा आहे? हे जाणून घेण्यासाठी आतुर आहेत. आता चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडियाद्वारे चित्रपटाचा रिव्ह्यू सांगितला आहे. तसेच त्यांनी चित्रपटाला दिलेल्या 4 स्टार रेटिंगने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

चित्रपटाला 4 स्टार रेटिंग

रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या पहिल्या रिव्ह्यूसनुसार हा चित्रपट अत्यंत ‘पॉवर-पॅक्ड’ आहे. शुक्रवारी सकाळी तरण आदर्श यांनी त्यांच्या ‘X’ हँडलवरून या चित्रपटाला 4 स्टार रेटिंग दिले. त्यांनी नमूद केले की, हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांना दिलेली एक “भव्य आदरांजली” असून रितेशने दिग्दर्शक म्हणूनही उत्कृष्ट काम केले आहे.

“#RajaShivaji हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अदम्य जिद्द, धैर्य आणि दूरदृष्टीला दिलेला एक भव्य सिनेमॅटिक सलाम आहे… हे महाकाव्य भव्यता आणि भावनांचे अचूक मिश्रण असून, अभिमान आणि देशभक्तीने भरलेली ही कथा मनाला खोलवर भिडते,” असे आदर्श यांनी लिहिले.

“इतक्या महत्त्वपूर्ण विषयाची हाताळणी करणे सोपे काम नाही, परंतु दिग्दर्शक रितेश देशमुख यांनी कमालीचा आत्मविश्वास आणि विश्वासाने ही जबाबदारी पार पाडली आहे… त्यांची कथा सांगण्याची शैली खिळवून ठेवणारी आहे, त्यांची दृष्टी स्पष्ट आहे आणि चित्रपटाची मांडणी नेत्रदीपक आहे,” असेही तरण आदर्श यांनी पुढे म्हटले.

तरण आदर्श यांनी पुढे असेही नमूद केले की, एक अभिनेता म्हणूनही रितेश देशमुखने त्याच्या करिअरमधील सर्वोत्तम कामगिरी केली असून पडद्यावर त्याला पाहणे विलक्षण अनुभव आहे. त्यांनी चित्रपटातील संजय दत्त यांच्या कामाला “उत्कृष्ट” म्हटले आहे, तर अभिषेक बच्चन कथेला अधिक वजन मिळवून देतो असे सांगितले. विद्या बालन यांचा अभिनय “अप्रतिम” असून भाग्यश्री यांना पाहणे आनंदाचा अनुभव असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच जिनिलिया देशमुख आणि अमोल गुप्ते यांच्या कामगिरीचेही त्यांनी कौतुक केले.

आपल्या रिव्ह्यूचा शेवट करताना तरण आदर्श यांनी लिहिले, “#RajaShivaji हा चित्रपटसृष्टीचा विजय आहे – एक असा चित्रपट जो तुम्हाला अभिमान, भावना आणि प्रेरणा देतो… एक भव्य सोहळा, प्रत्येक भारतीयाने नक्कीच
पाहावा असा चित्रपट!”

‘राजा शिवाजी’ चित्रपटाबद्दल

हा ऐतिहासिक चित्रपट मराठा साम्राज्याच्या स्थापनेचा सुरुवातीचा काळ, त्यांची स्वराज्याची संकल्पना आणि तत्कालीन बलाढ्य सत्तांविरुद्धचा त्यांचा संघर्ष यावर प्रकाश टाकतो. तसेच चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्याला आव्हान देत स्वतंत्र राज्याची स्थापना कशी केली हे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि जिनिलिया देशमुख यांनी केली आहे. हा चित्रपट आता चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.

Follow Us