डिंपल कपाडियाशी लग्न करण्यासाठी राजेश खन्ना यांची होती खास अट; ती मोडताच नातंही आलं संपुष्टात

लग्नाच्या काही वर्षांनंतर राजेश खन्ना यांची पत्नी आणि अभिनेत्री डिंपल कपाडिया ही त्यांना सोडून आपल्या दोन मुलींसोबत वेगळी राहू लागली. राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांनी 1973 मध्ये लग्नगाठ बांधली होती. तर 1982 पासून दोघं वेगळे राहत होते. त्यांनी अधिकृतरित्या घटस्फोट घेतला नव्हता.

डिंपल कपाडियाशी लग्न करण्यासाठी राजेश खन्ना यांची होती खास अट; ती मोडताच नातंही आलं संपुष्टात
Rajesh Khanna and Dimple Kapadia
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 28, 2023 | 4:10 PM

मुंबई : 28 ऑक्टोबर 2023 | बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना हे त्यांच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत असायचे. एकेकाळी अंजू महेंद्रू यांच्या प्रेमात असलेल्या राजेश खन्ना यांना अचानक अभिनेत्री डिंपल कपाडिया आवडू लागल्या होत्या. डिंपल त्यांच्यापेक्षा वयान बरीच लहान असतानाही दोघांनी लगेचच लग्नाचा निर्णय घेतला. 1973 मध्ये जेव्हा राजेश खन्ना यांनी जेव्हा डिंपल कपाडियाशी लग्न केलं तेव्हा तिचं वय फक्त 16 वर्षे होतं आणि राजेश खन्ना यांच्यापेक्षा वयाने ती 15 वर्षांनी लहान होती. लग्नानंतर काही वर्षांतच दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि ते वेगळे राहू लागले होते. राजेश खन्ना यांनी लग्नाआधी डिंपलसमोर काही अटी ठेवल्या होत्या. या अटींमुळे काही काळ दोघांचं नातं ठिकठाक चाललं. पण ज्यावेळी डिंपलने अट मोडली, त्याचवेळी त्यांचं नातंही तुटलं.

काय होती अट?

राजेश खन्ना यांनी लग्नापूर्वी मांडलेली अट डिंपलने मान्य केली होती. ही अट अशी होती की लग्नानंतर डिंपल चित्रपटांमध्ये काम करणार नाही. तर दुसरीकडे डिंपल लहानपणापासूनच राजेश खन्ना यांची खूप मोठी चाहती होती. म्हणून त्यांनी जेव्हा ही अट ठेवली, तेव्हा तिने लगेच मान्य केली. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस सर्वकाही ठीक होतं. मात्र हळूहळू दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. याचदरम्यान जेव्हा डिंपलने पुन्हा चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा बोलून दाखवली, तेव्हा त्यांचं नातं पूर्णपणे तुटलं. मात्र दोघांनी कधी घटस्फोट घेतला नव्हता. 1982 पासून राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया वेगवेगळे राहू लागले होते.

एका मुलाखतीत खुद्द राजेश खन्ना यांनी सांगितलं होतं की त्यांनी त्यांच्या एक्स गर्लफ्रेंडला विसरण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातून तिला कायमचं दूर करण्यासाठी डिंपलशी लग्न केलं होतं. राजेश खन्ना आणि अंजू महेंद्रू हे बऱ्याच काळापर्यंत रिलेशनशिपमध्ये होते. हे दोघं सात वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते आणि राजेश खन्ना यांचा लग्नसुद्धा करायचं होतं. मात्र अंजू यांनी लग्नाला नकार दिला. कारण त्यांना चित्रपटांमध्ये काम करत राहायचं होतं.