पैशांचा पाऊस, गोळीबार… अन् माजी मंत्र्याच्या मुलाला अटक, धुळे पोलिसांनी आंदोलनातूनच उचललं
काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्र्याच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. एका गोळीबार प्रकरणात ही अटक करण्यात आली असून, न्यायालयानं त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

काँग्रेसचे नेते आणि मध्यप्रदेश राज्याच्या माजी मंत्र्याच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांच्या हद्दीत एक वर्षांपूर्वी जंगलात पैशांचा पाऊस पाडण्यासाठी दीड लाख दिल्यानंतर पाऊस न पडल्याने वाद झाल्यामुळे गोळीबाराची घटना घडली होती. त्या प्रकरणात माजी मंत्री हिरालाल सिलावट यांचा मुलगा आणि काँग्रेस पक्षाचे माजी युथ काँग्रेस प्रदेश महासचिव यशवंत सिलावट याला अटक करण्यात आली आहे. शिरपूर तालुक्यातील सलाईपाडा येथील दुर्गम भागात मांत्रिक पैशाचा पाऊस पाडतो, असे ऐकून गणेश रामदास चौरे (वय ३० रा. बऱ्हाणपूर) व त्याच्या सहकाऱ्यांनी कथित मांत्रिक गुलजारसिंग पारसिंग पावरा (वय ५७) याच्याशी संपर्क साधला होता. शिवाय पैशांचा पाऊस पाडण्यासाठी विधी करण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी दीड लाख रुपये देण्याचे ठरले.
त्यानुसार व विधी पूर्ण झाल्यावर पैशांचा पाऊस पडला नाही. त्यामुळे वाद झाला होता. यावेळी गोळीबार झाला, शिवाय विधीसाठी दिलेले पैसे परत करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी गुलाजरसिंगने केवळ ५० हजार रुपये परत करणार असल्याचे सांगितले. त्यातून वाद विकोपाला गेला. गुलजारसिंग व इतरांना मारहाण करत गोळी झाडून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. त्यानंतर हल्लेखोर जंगलात पसार झाले.
गुलजारसिंग पावरा यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. गोळीबारात गुलजारसिंग पावरा व शिवा पावरा हे जखमी झाले होते. खासगी रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. घटनेनंतर शिरपूर पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासह जखमींना रुग्णालयात दाखल केले. संशयितांच्या शोधासाठी मध्य प्रदेशात गेलेल्या पथकाने बऱ्हाणपूर व खंडवा येथून गणेश चौरे, रतीलाल गणपत तायडे (वय ५०), अंकित अनिल तिवारी (वय २५), विशाल करणसिंग कश्यप (वय ३९) यांना अटक केली होती. तर गुलजारसिंग व त्याला मदत करणारा शिवा पावरा यांनी पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवले, त्याबद्दल दोघांविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणात आता यशवंत सिलावट यांना देखील अटक करण्यात आली आहे.
खंडवा येथील काँग्रेस नेते यशवंत सिलावट यांना महाराष्ट्र पोलिसांनी रविवारी दुपारी अटक केली आहे. मध्यप्रदेश येथील खंडवा येथे काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारकडून मनरेगा योजनेचे नाव बदलण्यात आल्याच्या निषेधार्थ आयोजित केलेल्या आंदोलनात यशवंत सिलावट सहभागी झाले होते. सुरू असलेल्या आंदोलनादरम्यानच कोतवाली पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.अटकेनंतर सिलावट यांना खंडवा कोतवाली पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे काही काळ चौकशी केल्यानंतर महाराष्ट्राती धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांनी त्यांना अटक केली असून दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
