Rajinikanth | योगी आदित्यनाथ यांच्या पाया का पडले ? खुद्द रजनीकांत यांनीच केला खुलासा…

अभिनेते रजनीकांत हे योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडल्यानंतर विविध स्तरातून टीका होत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता या मुद्यावर खुद्द रजनीकांत यांनीच स्पष्टीकरण दिले आहे.

Rajinikanth | योगी आदित्यनाथ यांच्या पाया का पडले ? खुद्द रजनीकांत यांनीच केला खुलासा...
| Updated on: Aug 22, 2023 | 11:38 AM

चेन्नई| 22 ऑगस्ट 2023 : ‘थलायवा’ या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते रजनीकांत (Rajinikanth) यांची क्रेझ फक्त साऊथमध्येच नव्हे तर बॉलिवूडमध्येही असून त्यांचे कोट्यावधी चाहते आहेत. रजनीकांत यांचा ‘जेलर’ (jailer) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफीसवर मोठा गल्ला कमावला आहे. मात्र रजनीकांत हे केवळ या चित्रपटामुळेच नव्हे तर आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आहेत, ते म्हणजे त्यांची व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट.

काही दिवसांपूर्वी रजनीकांत यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती, त्या भेटीचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता. त्यामध्ये कारमधून उतरल्यानंतर रजनीकांत हे योगी आदित्यनाथ यांच्या पायांना स्पर्श करताना दिसत होते. त्यावरून ते बरेच
ट्रोल झाले. कारण योगी आदित्यनाथ हे रजनीकांत यांच्यापेत्रक्षा सुमारे 20 वर्षांनी लहान आहेत, त्यामुळेच लोकांनी त्याना ट्रोल केले. मात्र आता खुद्द रजनीकांत यांनीच या कृतीमागचे कारण स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले रजनीकांत ?

उत्तप प्रदेशचा दौरा संपवून रजनीकांत चेन्नई एअरपोर्टला पोहोचल्यानंतर पत्रकारांनी त्यांना घेरले. त्यांचे बहुतांश प्रश्न हे योगी आदित्यनाथ यांच्याशी संबंधित होते. रजनीकांत हे त्यांच्या पाया का पडले, असाच प्रश्न बहुतांश पत्रकारांनी त्यांना विचारला असता अखेर त्यांनी यावर खुलासा केला. ‘ ही माझी सवय आहे. मला जर कोणीही योगी किंवा संन्यासी दिसले तर मी त्यांच्या पायांना स्पर्श करून (त्यांचा) आशीर्वाद घेतो,’ असे रजनीकांत यांनी स्पष्ट केले.

 

लोकांनी केली होती टीका

ते (समोरील व्यक्ती) माझ्यापेक्षा लहान असले तरी काय झालं, ते जर योगी किंवा संन्यासी असती तर मी त्यांचा आशीर्वाद जरूर घेतो, ही माझी सवयच आहे, असं रजनीकांत पुढे म्हणाले. रजनीकांत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पायांना स्पर्श केल्यावर विविध स्तरातून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. 72 वर्षांच्या अभिनेत्याने त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असलेल्या आदित्यनाथ यांच्या पायांना हात लावणे योग्य होते का, असा सवाल अनेकांनी विचारला. रजनीकांत यांना बरंच ट्रोल करण्यात आलं, अनेक चाहत्यांनी नाराजीही व्यक्त केली होती.

 

रजनीकांत हे त्यांचा ‘जेलर’ हा चित्रपट योगी आदित्यनाथ यांच्यासोबत पाहणार होते. भेटीच्या आधी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याविषयीची माहिती दिली होती. लखनऊमधील चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्यासुद्धा पोहोचले होते. त्यांनीही चित्रपटातील कलाकारांचं कौतुक केलं. दरम्यान ‘जेलर’ हा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा तमिळ चित्रपट ठरला आहे.