काय! राजपाल यादवला मदतीचे पैसे मिळालेच नाहीत? फक्त घोषणांचा पाऊस? भावाचा धक्कादायक दावा

बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाद्वारे राजपाल यादवला मदत जाहीर केली. परंतु याप्रकरणी आता अभिनेत्याचा भाऊ श्रीपाल यादव याने धक्कादायक दावा केला आहे. हा दावा नेमका काय आहे, त्याबद्दल सविस्तर वाचा..

काय! राजपाल यादवला मदतीचे पैसे मिळालेच नाहीत? फक्त घोषणांचा पाऊस? भावाचा धक्कादायक दावा
Rajpal Yadav
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 13, 2026 | 12:32 PM

अभिनेता राजपाल यादवच्या चेक बाऊन्स प्रकरणी येत्या सोमवारी म्हणजेच 16 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. यादरम्यान राजपालचा भाऊ श्रीपाल यादव याने धक्कादायक दावा केला आहे. सोशल मीडियावर मोठमोठ्या सेलिब्रिटींनी मदतीचे दावे केले, परंतु राजपालच्या कुटुंबाला अद्याप कोणतीच आर्थिक मदत न मिळाल्याचा दावा श्रीपालने केला आहे. राजपाल यादवने 5 फेब्रुवारी रोजी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं होतं. तेव्हापासून तो तुरुंगातच आहे. मी एकटा पडलोय, माझे कोणी मित्रही नाहीत, अशी भावूक प्रतिक्रिया त्याने तुरुंगात जाण्यापूर्वी दिली होती. त्यानंतर बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींनी त्याच्यासाठी मदत जाहीर केली. सोनू सूद, गुरमीत चौधरी, सलमान खान, मिका सिंह, इंदरजीत सिंह यांसह इतरही काही सेलिब्रिटींनी त्याला मदत जाहीर केली आहे.

श्रीपाल यादवने ‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय, “जर लोकांनी मदत केली असेल तर कृपया आम्हाला त्याची माहिती द्या की पैसे नेमके कोणाला आणि कुठे दिले आहेत? कारण राजपालचं अकाऊंट ज्याच्याकडून सांभाळलं जातं, त्याने आम्हाला सांगितलंय की अद्याप त्याच्या अकाऊंटमध्ये कोणतीही मदत पोहोचलेली नाही. जर कोणी मदत पाठवली असेल तर पैसे कुठे दिले आणि कोणाला दिले, हे आम्हाला सांगावं. कुटुंबीयांना याबद्दल काहीच माहिती नाही. पण जर खरंच कोणी मदत केली असेल तर मी त्यांचा आभारी आहे. सोशल मीडियावर फक्त मदतीचा बोलबाला होतोय.”

तुरुंगात सरेंडर करण्याआधी भावाशी झालेल्या शेवटच्या संवादाबद्दलही श्रीपालने सांगितलं आहे. “राजपालने मला फोन केला आणि म्हणाला की चिंता करू नका. मला फक्त एका दिवसासाठी कोर्टात जायचं आहे आणि काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायच्या आहेत. आम्हाला खात्री आहे की तो लवकरच तुरुंगातून बाहेर येईल”, असं श्रीपालने स्पष्ट केलं.

राजपाल यादवला कोणाकोणाची मदत?

  • ‘जेमट्युन्स म्युझिक’चे मालक इंदरजीत सिंह यांनी 1.1 कोटी रुपयांची मदत केली आहे.
  • जनशक्ती जनता दलचे (JJD) प्रमुख तेज प्रताप यादव यांनी घोषणा केली की ते राजपाल यादवची 11 लाख रुपयांची मदत करणार आहेत.
  • कमाल आर खान उर्फ केआरकेनं राजपालची 10 लाख रुपयांची मदत केली आहे.
  • गुरमीत चौधरी, सलमान खान, वरुण धवन, अजय देवगण, गुरू रंधावा आणि सोनू सूद यांनीसुद्धा मदतीचा हात पुढे केला आहे. परंतु ते किती पैशांची मदत करतील, याचा खुलासा त्यांनी केला नाही.
  • गायक मिका  सिंहने 11 लाखांची मदत जाहीर केली आहे.