गावात कोट्यवधींची संपत्ती, तरी राजपाल यादव का फेडू शकला नाही कर्ज? नेमकी भानगड काय?

अभिनेता राजपाल यादव सध्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्याच्यावर 9 कोटी रुपयांचं कर्ज असून चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. राजपालकडे गावी कोट्यवधींची संपत्ती असतानाही अशी वेळ का आली?

गावात कोट्यवधींची संपत्ती, तरी राजपाल यादव का फेडू शकला नाही कर्ज? नेमकी भानगड काय?
राजपाल यादव
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 13, 2026 | 12:56 PM

प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजपाल यादव सध्या त्याच्या कर्जबाजारीपणामुळे चर्चेत आला आहे. ‘अता पता लापता’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्याने मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून पाच कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हेच कर्ज आता राजपालच्या गळ्याचा फास बनला आहे. व्याज आणि पेनल्टी मिळून आता या कर्जाची रक्कम 9 कोटी रुपये झाली आहे. हे कर्ज न फेडल्यामुळे राजपाल सध्या तिहार तुरुंगात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे उत्तर प्रदेशातील शाहजहांनपूरमध्ये कोट्यवधींची संपत्ती आणि बॉलिवूडमधील अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारूनही राजपालवर तुरुंगात जाण्याची वेळ का आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राजपाल यादव हा शाहजहांपूर इथल्या विकासखंड बंडाच्या कुंडरा गावात राहणार आहे. स्थानिक चर्चा आणि काही मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याच्या कुटुंबीयांकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. मग तरी राजपाल त्याच्यावरील 5 कोटी रुपयांचं का फेडू शकला नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शाहजहांपूरमध्ये राजपालचे वडील नौरंग यादव यांच्या नावावर बहुमूल्य जमीन होती. वडिलांच्या निधनानंतर आता ती जमीन कोणाच्या नावावर आहे, याबद्दलची अधिकृत माहिती समोर आली नाही. तर काहीजण असंही म्हणत आहेत की, राजपालने त्याच्या संपत्तीतून हा वाद सोडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. परंतु त्याने कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेतला.

गुरुवारी राजपालच्या जामीन अर्जाबाबत कोर्टात सुनावणी झाली असता कोर्टाने त्याला फटकारलं. तुला 25 ते 30 संधी दिल्या होत्या, तरीसुद्धा पैसे भरण्यास तू अपयशी ठरला, असं कोर्टाने म्हटलंय. आश्वासनांनी पूर्तता करण्यात राजपाल वारंवार अपयशी ठरल्याबद्दल कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर त्याला चेक बाऊन्स प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आणि तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

नेमकं काय आहे प्रकरण?

2010 मध्ये राजपाल यादवने एम. एस. मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून त्याच्या एका चित्रपटासाठी पाच कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. ‘अता पता लापता’ या चित्रपटाचं दिग्दर्शन राजपाल करत होता. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आणि त्यामुळे त्याला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. व्याज, दंड, विलंबित देयकं यांमुळे थकबाकीची रक्कम जवळपास 9 कोटी रुपयांपर्यंत वाढली. कर्ज चुकवण्यासाठी त्याने कर्जदात्याला अनेक चेक्स दिले होते. परंतु हे चेक्स बाऊन्स झाले. त्यामुळे नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यांतर्गत त्याच्याविरोधात फौजदारी कारवाई सुरू झाली.