
गेल्या काही दिवसांपासून ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा युट्यूब शो चर्चेत आहे. या शोमधील एका व्हायरल झालेल्या व्हिडीओबद्दल प्रचंड चर्चा आहे आणि वादही. प्रसिद्ध युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाने एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. विनोदी कलाकार समय रैनाच्या या शोमध्ये रणवीरने आईवडिलांच्या नात्यावर केलेल्या कमेंटमुळे लोक खूप संतापले आहेत . हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलेलं आहे.
रणवीरच्या या वक्तव्यावर अभिनेते मुकेश खन्नांची प्रतिक्रिया
रणवीरच्या या वक्तव्यावर केवळ सामान्य जनताच नाही तर अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता बॉलिवूड अभिनेता आणि ‘शक्तीमान’ म्हणून प्रसिद्ध असलेले मुकेश खन्ना यांनीही या प्रकरणावर संताप व्यक्त करत विधान केलं आहे.
“अशा लोकांची गाढवावरूव धिंड काढली पाहिजे…”
मुकेश खन्ना हे त्यांच्या स्पष्टवक्त्यासाठी ओळखले जातात. रणवीरच्या कमेंटवर मुकेश यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मुकेश म्हणाले की ,”अशा लोकांची गाढवावरूव धिंड काढायला हवी” अशी प्रतिक्रिया देत त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर या विषयाबाबत आपले मत मांडले आहे.
काय म्हणाले मुकेश?
मुकेश म्हणाले की, “रणवीर अलाहाबादियासारख्या यशस्वी युट्यूबरने इंडियाज गॉट टॅलेंट सारख्या शोमध्ये असे अश्लील विधान करणे हे खूप दुःखद आहे. या एका विधानामुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. ते म्हणाले की, आपल्या देशातील तरुणांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यांना त्याचे मूल्य कळत नाहीये. मर्यादा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ नाही”
“ही बाब त्यांनी हलक्यात घेऊ नये…”
ते पुढे म्हणाले की, ” ही एक गंभीर बाब आहे आणि ती त्यांनी ही बाब हलक्यात घेऊ नये. यासाठी गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून लोकांनी अशी असभ्य आणि बेजबाबदार विधाने करू नयेत. अशा लोकांसाठी माझ्याकडे एक शिक्षा आहे. अशा लोकांचे चेहरे काळे केले पाहिजेत आणि त्यांना गाढवावर बसवून शहरात फिरवले पाहिजे. म्हणजे असं पुन्हा कोणीही करणार नाही.” असं वक्तव्य करत त्यांनी त्यांचा राग व्यक्त केला आहे.