इंड्रस्ट्रीत बंदी घातल्यानंतर रणवीर सिंहची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला “मी जाणूनबुजून..”

अभिनेता रणवीर सिंहवर बॉलिवूड इंडस्ट्रीत बंदी घालण्याचा मोठा निर्णय FWICE ने घेतला आहे. या निर्णयावर आता रणवीरकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे, ते सविस्तर जाणून घ्या..

इंड्रस्ट्रीत बंदी घातल्यानंतर रणवीर सिंहची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला मी जाणूनबुजून..
Ranveer Singh
Image Credit source: Instagram
| Updated on: May 26, 2026 | 9:33 AM

‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या दोन्ही चित्रपटांमुळे यशाच्या शिखरावर असलेल्या अभिनेता रणवीर सिंहला फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (FWICE) मोठा झटका दिला आहे. रणवीरवर बॉलिवूड इंडस्ट्रीत बंदी घालण्याचे आदेश FWICE ने दिले आहेत. अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ या चित्रपटावरून सुरू असलेल्या वाद प्रकरणी हा निर्णय घेण्यात आला आहे. या बंदीच्या आदेशानंतर आता रणवीरच्या टीमकडून प्रतिक्रिया समोर आली आहे. रणवीर जाणूनबुजून याप्रकरणी मौन बाळगून होता, असं त्याच्या टीमने स्पष्ट केलं आहे. अशी प्रकरणं तो सार्वजनिकरित्या नाही तर परस्पर चर्चेतून आणि सामंजस्यातून सोडवू इच्छितो, असं म्हटलं गेलंय.

रणवीरची प्रतिक्रिया

रणवीरच्या प्रवक्त्याने या प्रकरणी म्हटलंय, ‘या चित्रपटसृष्टीचा आणि डॉन फ्रँचाइजीशी संबंधित प्रत्येक व्यक्तीचा रणवीर खूप आदर करतो. याप्रकरणी त्याने जाणूनबुजून मौन बाळगलं होतं, कारण त्याच्या मते व्यावसायिक संवाद आणि वैयक्तिक नात्यांना प्रतिष्ठा, परिपक्वता आणि एकमेकांच्या सन्मानानेच सांभाळलं पाहिजे. वेळोवेळी त्याच्याबद्दल विविध चर्चा झाल्या, अंदाज व्यक्त करण्यात आले, पण रणवीरने कधीच सार्वजनिकरित्या उत्तर देण्याला किंवा अंदाजांना अधिक हवा देणं गरजेचं मानलं नाही. त्याचं संपूर्ण लक्ष कामावर आणि आगामी प्रोजेक्ट्सवर आहे. डॉन चित्रपटाच्या फ्रँचाइजीशी संबंधित सर्व लोकांचा तो आदर करतो आणि डॉन 3 या चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा देतो. अशा काळात धैर्याने वागण्याचा आणि शांतीपूर्ण राहण्याचा त्याचा निर्णय असून यापुढेही तो हेच करणार आहे.’

नेमका वाद काय?

गेल्या काही दिवसांपासून फरहान अख्तर आणि रणवीर सिंह यांच्यात ‘डॉन 3’ चित्रपटावरून वाद सुरू आहे. काही मतभेदांमुळे रणवीरने शूटिंग सुरू होण्याच्या काही दिवस आधीच चित्रपटातून माघार घेतली. यामुळे निर्मात्यांना 45 कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं. याप्रकरणी एप्रिल महिन्यात फरहानने FWICE कडे तक्रार दाखल केली होती. फरहानने रणवीरकडे 45 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. फरहानच्या तक्रारीनंतर FWICE ने दर दहा दिवसांनी रणवीरला तीन नोटीस बजावले होते. मात्र त्यावर कोणतीच प्रतिक्रिया समोर न आल्याने अखेर त्याच्यावर बंदीचा निर्णय घेण्यात आला. त्याचसोबत इंडस्ट्रीतल्या लोकांना आदेश देण्यात आला आहे की जोपर्यंत तो फरहानला नुकसानभरपाई देत नाही, तोपर्यंत त्याच्यासोबत कोणीच काम करू नये.

Follow Us