तुमच्या बॉयफ्रेंड-गर्लफेंडवरून निशाणा साधत..; रवीना टंडनकडून बॉलिवूडची पोलखोल

| Updated on: Mar 26, 2024 | 1:00 PM

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री रवीना टंडन बॉलिवूड इंडस्ट्रीविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. इंडस्ट्रीत काही लोक इतरांच्या यशाबद्दल खूप असुरक्षित असतात आणि त्यांना खाली पाडण्यासाठी ते काहीही करू शकतात, असं ती म्हणाली.

तुमच्या बॉयफ्रेंड-गर्लफेंडवरून निशाणा साधत..; रवीना टंडनकडून बॉलिवूडची पोलखोल
Raveena Tandon
Image Credit source: Instagram
Follow us on

बॉलिवूड इंडस्ट्रीवर आजवर अनेकांनी टीका केली. इतकंच काय तर या इंडस्ट्रीत काम करणाऱ्या कलाकारांनीच अनेकदा त्याची पोलखोल केली. आता अभिनेत्री रवीना टंडनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या लोकांविषयी महत्त्वपूर्ण वक्तव केलंय. फिल्म इंडस्ट्रीतील लोक प्रचंड असुरक्षित आणि स्वत:च्या फायद्यासाठी इतरांचं नुकसान करायला कधीही तयार असतात, असं तिने म्हटलंय. त्याचप्रमाणे आपल्या करिअरमध्ये अनेकदा इतरांच्या राजकारणाचा फटका सहन केल्याचंही तिने सांगितलंय.

‘राजश्री अनप्लग्ड’ला दिलेल्या या मुलाखतीत रवीना म्हणाली, “नव्वदच्या दशकात सेटवरील वातावरण फार खेळीमेळीचं असायचं. लोक एकमेकांना भांडणांवरून, अफेअर्सवरून, सूडाच्या नाटकाबद्दल दिलखुलासपणे चिडवायचे. सेटवरचं वातावरण अत्यंत अॅक्शन-पॅक्ड वाटायचं. पण काही लोकांच्या मनात सतत असुरक्षिततेची भावना असते. इतरांना यश मिळालेलं त्यांना सहन होत नाही. इतरांचा पाय कसा खेचायचा, याचा विचार ते करतात. मग हेच काम ते त्यांच्या रिलेशनशिपद्वारे किंवा ग्रुपद्वारे करतात. तुमच्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडवरून ते तुमच्यावर टीका करतात.”

हे सुद्धा वाचा

“आपल्या फिल्म इंडस्ट्रीत बरीच स्पर्धा आहे. पण कोणत्या इंडस्ट्रीत अशी स्पर्धा नसते? राजकारण आणि कॉर्पोरेट क्षेत्रातही असंच होतं. फरक इतकाच आहे की फिल्म इंडस्ट्रीबद्दल सर्वाधिक लिहिलं जातं. कारण प्रसिद्ध लोकांबद्दलच्या गॉसिप्स जाणून घेण्यासाठी लोकांना फार उत्सुकता असते. या क्षेत्रातही लोक खूप राजकारण करतात आणि माझ्यासोबतही ते झालंय”, असं रवीना पुढे म्हणाली.

फिल्म इंडस्ट्रीत काम करताना जाणूनबुजून कधीच कोणाच्या करिअरला धोका पोहोचवला नसल्याचंही रवीनाने स्पष्ट केलं. “जर माझ्यामुळे कधी कोणासोबत असं काही घडलं असेल तर ते अनवधानाने असेल आणि त्यासाठी मी माफीही मागायला तयार आहे. माझे बाबा म्हणायचे की जेव्हा लहान मूल चालायला शिकतं, तेव्हा अनेकदा ते धडपडतं. आपल्या पायांवर उभं राहण्यासाठी ते बाळ अनेकदा पडतं आणि त्यानंतर स्वत:च चालायला शिकतं. मला हीच शिकवण मिळाली आहे. मी कधीच कोणाला जाणुनबुजून दुखावलं नाही किंवा कोणाला चित्रपटातून काढून टाकलं नाही. मला नवोदित कलाकारांसोबत काम करण्यासही काही अडचण नाही. कारण एकेकाळी मीसुद्धा नवोदित कलाकारच होते”, असं वक्तव्य रवीनाने केलंय.