आजवर मद्यपान केलं नाही, भविष्यातही..; ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या सक्सेस पार्टीतील व्हिडीओवर रितेशकडून दिलगिरी व्यक्त
'राजा शिवाजी' या चित्रपटाच्या यशानंतर रितेश देशमुखच्या टीमकडून पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमधील एका व्हिडीओमुळे रितेशला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्यावर आता त्याने स्पष्टीकरण दिलं आहे.

रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाला महाराष्ट्रासह देशभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला. 1 मे 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची थिएटरमध्ये एक महिना उलटल्यानंतरही चांगली कमाई सुरू आहे. मराठीत सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रमही या चित्रपटाने रचला आहे. यानिमित्त चित्रपटाच्या टीमकडून एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या सक्सेस पार्टीला इंडस्ट्रीतील विविध सेलिब्रिटी आणि मित्रपरिवार उपस्थित होता. या पार्टीमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावरून नेटकऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली होती. या व्हिडीओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला टी-शर्ट घालून रितेश बॉलिवूड गाण्यावर डान्स करताना दिसला होता. त्यावरून अनेकांनी टीका करण्यास सुरुवात केली. तर काहींनी रितेशवर मद्यपान केल्याचाही आरोप केला. या संपूर्ण वादावर अखेर रितेशने एक पोस्ट लिहित आपली बाजू स्पष्ट केली आहे.
काय म्हणाला रितेश देशमुख?
रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. त्यात त्याने म्हटलंय, ‘नमस्कार, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाच्या आनंदानिमित्त आमच्या संपूर्ण टीमने एक छोटेखानी आनंदोत्सव आयोजित केला होता. त्यासंबंधाने माझा एक व्हिडीओ सद्या समाजमाध्यमांवर फिरत होता. एक शिवप्रेमी आणि प्रेक्षक कुटुंब या नात्याने मी याचं स्पष्टीकरण देणं माझं कर्तव्य मानतो. मी नम्रपणे स्पष्ट करू इच्छितो की, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला टी-शर्ट परिधान करून आनंद साजरा कऱण्यामागे त्यांचा अवमान करण्याचा माझा किंचितही हेतू नव्हता. तो टी-शर्ट मी चित्रपटाच्या प्रचारादरम्यान वापरत होतो. त्यादिवशीही मी प्रचारकार्य पूर्ण करून थेट कार्यक्रमात सहभागी झालो असल्याने टी-शर्ट बदलणं राहून गेलं.’
रितेशची पोस्ट-
मद्यपानाच्या आरोपांवर स्पष्टीकरण-
मद्यपानाच्या आरोपांवर त्याने पुढे लिहिलं, ‘तसंच माझ्याबाबत समाजमाध्यमांवर होत असलेल्या काही दाव्यांविषयीही स्पष्ट करू इछ्छितो की, मी आजवर कधीही मद्यपान केलेलं नाही आणि भविष्यातही करणार नाही. त्यामुळे या संदर्भातील कोणतेही आरोप वस्तुस्थितीला धरून नाहीत. विशेष म्हणजे, हा व्हिडीओ चित्रित करणाऱ्या व्यक्तीला संबंधित कार्यक्रमाचं निमंत्रणदेखील देण्यात आलेलं नव्हतं. या कार्यक्रमाचं आयोजन ‘राजा शिवाजी’ या चित्रपटासाठी साडेतीन वर्षे अर्थ परिश्रम घेतलेल्या, कॅमेरामागील आणि कॅमेरासमोरील सर्व कलावंत आणि सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करण्यात आलं होतं. तथापि, माझ्या या कृतीमुळे कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील, तर एक शिवप्रेमी म्हणून मी मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो.’
‘छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांच्या श्रद्धेचे, प्रेरणेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांच्याविषयी माझ्या मनात अत्यंत आदर, प्रेम आणि निष्ठा आहे. ही भावना आजही तितकीच दृढ आहे आणि कायम राहील. जय शिवराय’, असंही रितेशने स्पष्ट केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘राजा शिवाजी’ हा बॉक्स ऑफिसवर 120 कोटी रुपयांची कमाई करणार पहिला चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांची मोठी फौज पहायला मिळते. रितेशसह जिनिलिया देशमुख, अभिषेक बच्चन, विद्या बालन, बोमन इराणी, फरदीन खान, महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, सचिन खेडेकर, भाग्यश्री यांनीही भूमिका साकारल्या आहेत.