शिवरायांच्या काळातली चौरंगाची शिक्षा..; भोर अत्याचारप्रकरणी रितेश देशमुख स्पष्टच बोलला
भोर तालुक्यातील नसरापूर परिसरातील तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचारप्रकरणी अभिनेता रितेश देशमुखने तीव्र संताप व्यक्त केला आहे. असं काही घडलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दिली जाणारी चौरंग करण्याची शिक्षा आठवते, असं तो म्हणाला.

पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी राजगड पोलिसांनी 65 वर्षांच्या आरोपीला अटक केली आहे. साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर एका गोठ्यात अत्याचार करण्यात आलं. त्यानंतर आरोपीने मुलीला दगडाने ठेचून मारलं. आरोपीने तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरल्याचं उघडकीस आल्यानंतर संतप्त पडसाद उमटले. याप्रकरणी आता अभिनेता रितेश देशमुखने प्रतिक्रिया दिली आहे. “अशा जेव्हा घटना घडतात, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील चौरंग करण्याची शिक्षा आठवते. अशा घटनांचा एवढा राग येतो की, आपण काहीच करू शकत नाही, असं वाटू लागतं,” असं रितेश म्हणाला.
काय म्हणाला रितेश?
“अशा घटना जेव्हा घडतात, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील चौरंग करण्याची शिक्षा आठवते. अर्थात आजचा काळ वेगळा आहे आणि तेव्हाचा काळ वेगळा होता. असं असलं तरी पोलीस, सरकार आणि न्यायालयाने आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा द्यावी. फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवावा आणि पीडितेच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय द्यावा. आरोपीला कठोर आणि रोखठोक शिक्षा झाली तर असं काही करण्याचा विचारसुद्धा दुसरं कोणी करणार नाही”, अशी मागणी रितेशने केली आहे.
चौरंग शिक्षा म्हणजे काय?
पुण्यापासून नऊ कोसांवर असलेल्या रांझे गावचा पाटील बाबाजी ऊर्फ भिकाजी गुजरने एका स्त्रीसोबत गैरवर्तन केल्याचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर आलं होतं. माँसाहेब जिजाऊ यांना ही बातमी समजताच त्यांच्या रागाचा पारा चढला होता. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी तातडीने बाबाजी ऊर्फ भिकाजी गुजरला बोलावून घेतलं. सर्वांसमोर महाराजांनी त्याची चौकशी केली आणि त्याअंती गुन्हा सिद्ध झाला. गुन्हा इतका गंभीर होता की त्यासाठी साधी शिक्षा दिली तर रयतेत उठसूठ कोणीही हे दुष्कर्म करेल याची महाराजांना जाण होती. तेव्हा त्यांनी चौरंगाची शिक्षा देण्याचं फर्मान दिलं होतं. महिलेसोबत केलेल्या दुष्कर्माबद्दल त्याचे हातपाय कलम करण्यात आले होते. हात पाय कलम केल्यानंतर रक्तस्राव होऊन दगावू नये यासाठी जखमा गरम तुपात बुडवल्या गेल्या. गैरकृत्याला माफी नाही, मग तो कोणीही असो याची जाण सर्वांना यावी यासाठी महाराजांनी ही चौरंग अशी कठोर शिक्षा दिली होती.