Riteish Deshmukh: पाहून अंगावर काटा आला..; रितेश देशमुखच्या या कृतीने जिंकली नेटकऱ्यांची मनं

Riteish Deshmukh: रितेश देशमुखचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. पाहून अंगावर काटाच आला.. अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

Riteish Deshmukh: पाहून अंगावर काटा आला..; रितेश देशमुखच्या या कृतीने जिंकली नेटकऱ्यांची मनं
रितेश देशमुख
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 12, 2026 | 10:03 AM

Riteish Deshmukh: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख हा आपल्या अभिनयासोबतच साधेपणा आणि विनम्र स्वभावासाठीही ओळखला जातो. सध्या त्याचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. एका चाहत्याने रितेशला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो भेट दिला. मात्र, हा फोटो स्वीकारताना रितेशने जे केलं, त्यामुळे चाहत्यांची मनं जिंकली आहेत. महाराजांचा फोटो असल्याचं लक्षात येताच रितेशने क्षणाचाही विलंब न करता आपल्या पायातील चप्पल काढली आणि त्यानंतरच तो फोटो स्वीकारला. त्याच्या या कृतीचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे.

महाराजांचा फोटो पाहताच काढली चप्पल

रितेश देशमुख नुकताच लातूरमध्ये गेला होता. यावेळी एका चाहत्याने त्याची भेट घेत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो भेट म्हणून दिला. चाहत्याकडून फोटो स्वीकारताना त्यावर महाराजांचा फोटो असल्याचं रितेशच्या लक्षात आलं. त्यानंतर त्याने लगेच पायातील चप्पल काढली आणि महाराजांचा फोटो हातात घेतला. त्यानंतर चाहत्यासोबत फोटोही काढला. या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर तो वेगाने व्हायरल झाला.

Loading...

पहा व्हिडीओ-

चाहत्याने पोस्ट लिहून व्यक्त केल्या भावना

रितेशला फोटो भेट देणाऱ्या चाहत्याने सोशल मीडियावर या खास प्रसंगाबद्दल एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्याने म्हटलं, ‘आज मी एक हिरो तर पहिल्यांदाच पाहिला, पण त्याचसोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा एक खरा मावळाही पाहिला.’ पुढे त्याने लिहिलं की, महाराजांचा इतिहास संपूर्ण जगाला कळावा, त्यांचं शौर्य आणि विचार प्रत्येकापर्यंत पोहोचावेत यासाठी रितेश चित्रपटांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. त्याचे हे प्रयत्न कौतुकास पात्र आहेत. मात्र, लातूरमधील भेटीदरम्यान घडलेली एक गोष्ट त्याच्या मनाला विशेष भावली. महाराजांचा फोटो हातात देताच रितेशने स्वतःच्या पायातील चप्पल काढली आणि त्यानंतर फोटो स्वीकारला. ही केवळ एक कृती नव्हती, तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्याच्या मनात असलेला आदर आणि प्रेम व्यक्त करणारा तो क्षण होता, असं चाहत्याने म्हटलं आहे.

‘महाराष्ट्राचा खरा हिरो’, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

रितेशचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनीही कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘हे आपल्या महाराष्ट्राचे खरे हिरो आहेत’, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली. तर दुसऱ्याने लिहिलं, ‘रितेश दादा, तुम्ही महाराजांचा फोटो पाहताच पायातील चप्पल काढली, अंगावर काटा आला. खरी हीच आपली संस्कृती आहे.’ आणखी एका नेटकऱ्याने ‘फोटोमध्ये महाराज आहेत हे समजताच पटकन चप्पल काढली. मोठ्या साहेबांचे संस्कार’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us