विशाल-नेहा कक्कर यांनी नाकारलं, आज त्याच इंडियन आयडॉलमध्ये रुबाबात एन्ट्री; ‘दिलरुबा दिलनशी’ने बदललं नशीब, कसा होता रितोचा प्रवास?
Dilruba dilnasheen song : इंडियन आयडॉलच्या मंचावर कधीकाळी स्पर्धेतून बाहेर पडलेल्या रितो रिबाच्या गाण्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. ‘दिलरुबा दिलनशीन’ या रोमँटिक गाण्याने काही आठवड्यांतच कोट्यवधी व्ह्यूजचा टप्पा गाठला आहे. कसा राहिलाय गायक रितो रिबाचा प्रवास?

कधी काळी ज्या मंचावरून स्पर्धेबाहेर पडावं लागलं, त्याच मंचावर पुन्हा परतण्याची संधी मिळणं ही कोणत्याही कलाकारासाठी मोठी गोष्ट असते. असंच काहीसं गायक रितो रिबाच्या बाबतीत घडलं आहे. इंडियन आयडॉलच्या ऑडिशनमध्ये परीक्षकांची दाद मिळवूनही त्याला टॉप 15 मध्ये स्थान मिळवता आलं नव्हतं. मात्र, त्याने हार मानली नाही. स्वतःच्या आवाजाच्या आणि संगीताच्या जोरावर त्याने अशी ओळख निर्माण केली की, एकेकाळी नाकारलेल्या याच शोमध्ये त्याला सेलिब्रिटी गेस्ट म्हणून बोलावण्यात आलं. आता त्याचं ‘दिलरुबा दिलनशी’ हे गाणं सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय होत असून, त्याच्या यशाची सर्वत्र चर्चा आहे.
एका गाण्याने मिळवून दिली नवी ओळख
सध्या रितो रिबाचं ‘दिलरुबा दिलनशी’ हे रोमँटिक गाणं रील्सपासून यूट्यूब शॉर्ट्सपर्यंत सर्वत्र ऐकायला मिळत आहे. 13 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या गाण्याने अवघ्या काही आठवड्यांत 24 मिलियन म्हणजेच 2.4 कोटी व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. प्ले डीएमएफच्या ‘दिलफेक’ अल्बममधील या गाण्याला रितोने स्वतः आवाज दिला असून संगीतही त्यानेच दिलं आहे. तर सिद्धांत कौशल यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. क्लासिकल संगीताची झलक आणि गुलजार यांच्या लेखनशैलीची आठवण करून देणारे शब्द यामुळे हे गाणं श्रोत्यांच्या पसंतीस उतरलं आहे.
इंडियन आयडॉलमध्ये मिळाला होता नकार
रितो रिबाचा जन्म 5 नोव्हेंबर 1999 रोजी अरुणाचल प्रदेशातील पासीघाट येथे झाला. कोणतंही औपचारिक संगीत प्रशिक्षण न घेता त्याने संगीत क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली. सुरुवातीला तो स्थानिक कार्यक्रमांमध्ये गाणी सादर करायचा. त्यानंतर 2021 मध्ये तो मुंबईत आला आणि वेगवेगळ्या रिअॅलिटी शोसाठी ऑडिशन देऊ लागला.
2022 मध्ये त्याने ‘इंडियन आयडॉल 13’ साठी ऑडिशन दिलं. यावेळी पारंपरिक पोशाखात पोहोचलेल्या रितोने परीक्षक नेहा कक्कर, विशाल ददलानी आणि हिमेश रेशमिया यांच्यासमोर स्वतःचं लिहिलेलं ‘हीर रांझणा’ हे गाणं सादर केलं. विशेष म्हणजे, त्याने गालो भाषेतही गाणं गाऊन परीक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. त्याच्या गायनाचं कौतुकही झालं. मात्र, थिएटर राऊंडमध्ये त्याला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. त्यामुळे टॉप 15 मध्येही त्याला स्थान मिळालं नाही.
नकारानंतरही थांबला नाही, स्वतःची गाणी केली लोकप्रिय
इंडियन आयडॉलमधून बाहेर पडल्यानंतर रितोने हार मानली नाही. उलट या शोमधून मिळालेल्या प्रसिद्धीचा उपयोग करत त्याने स्वतःची गाणी प्रदर्शित करण्यास सुरुवात केली. प्ले डीएमएफ या म्युझिक लेबलसोबत काम करण्याची संधी मिळाल्यानंतर त्याने ‘हीर रांझणा’ हे गाणं प्रदर्शित केलं. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री शिवांगी जोशी आणि रोहित खंडेलवाल झळकले होते. या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
त्यानंतर ‘रांझणा मेरी बनोगी क्या’ आणि ‘प्यार आता है’ यांसारख्या गाण्यांमधूनही त्याने श्रोत्यांची मनं जिंकली. आज त्याचं ‘दिलरुबा दिलनशी’ हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. विशेष म्हणजे, ज्या इंडियन आयडॉलच्या मंचावरून त्याला कधी स्पर्धेबाहेर जावं लागलं होतं, त्याच शोच्या 15 व्या पर्वात तो सेलिब्रिटी गेस्ट म्हणून सहभागी झाला होता. त्यामुळे रितो रिबाचा हा प्रवास सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.