
Groupism in Marathi Industry : घराणेशाही, गटबाजी यांसारखे मुद्दे विविध भाषेतील चित्रपटसृष्टीत सतत चर्चेत असतात. बॉलिवूड असो किंवा मराठी.. तिथल्या कलाकारांना थोड्याफार प्रमाणात यांचे अनुभव येतच असतात. त्यावर काहीजण मोकळेपणे बोलतात, तर काहीजण मौन बाळगणं पसंत करतात. मराठी इंडस्ट्रीतील ग्रुपिझ्म म्हणजेच गटबाजीबद्दल आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिचं मत मांडलं आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून ऋतुजा बागवे आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला मराठी इंडस्ट्रीतील गटबाजीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होती.
“गटबाजी इथे आहेच आणि प्रत्येक क्षेत्रात असते. पण मी त्याच्यावर रडत बसत नाही. कारण माझा मूळ स्वभावच फार बोलका नाहीये. त्यामुळे मी कोणत्याही ग्रुपचा भाग होत नाही. संपर्क मिळवणं, गप्पा मारणं, काम मिळेपर्यंत थांबणं.. हा माझा स्वभावच नाही. हे चुकीचं आहे की नाही माहीत नाही. पण माझा स्वभावच तसा नसल्याने मला हे सगळं करता येत नाही. सतत विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहा, सतत कुठे तरी झळका.. हेसुद्धा करायला मला आवडत नाही. त्यामुळे मी या सर्व गोष्टींमध्ये पडतच नाही”, असं ती ‘आरपार’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.
याविषयी तिने पुढे सांगितलं, “माझ्या हातात जी गोष्ट आहे, ते मी नक्की करते. इतकं प्रामाणिकपणे काम करायचं की चार लोकांनी स्वत:हून त्याची दखल घेतली पाहिजे. यावर मी पूर्ण भर देते. माझ्यासोबत असंच घडलंय आणि पुढेही तसंच घडत राहो. मला रातोरात मिळणारी प्रसिद्धी नकोच. हळूहळू मिळाली तरी चालेल. पण माझ्या कामामुळे लोकांनी मला ओळखायला पाहिजे, असं मला वाटतं.”
ऋतुजाने ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. तर ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतील भूमिकेमुळे तिला घराघरात प्रसिद्धी मिळाली. ऋतुजाने ‘ह्या गोजिरवाण्या घरात’, ‘स्वामिनी’, ‘पुढचं पाऊल’, ‘तू माझा सांगाती’, ‘चंद्र आहे साक्षीला’ यांसारख्या मालिका आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.